युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमित मिश्रा आणि ललित यादव यांच्यावर नवोदित कर्णधाराने भाष्य केले आहे.
मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ललित यादवने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने ४ षटक गोलंदाजी करत अवघ्या १७ धावा खर्च केल्या होत्या. यासोबत त्याने १ गडी देखील बाद केला होता. तर फलंदाजी करताना त्याने २२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर दुसरीकडे अमित मिश्राने देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने ४ षटकात २४ धावा देत ४ गडी बाद केले होते. या दोघांची कामगिरी पाहता रिषभ पंतने कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ललित यादवबद्दल बोलताना तो म्हणाला, “ललित एक उत्कृष्ट भारतीय खेळाडू आहे. तो या खेळपट्टीवर आमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. आम्ही त्याला तयार करत आहोत. तो नक्कीच भविष्यात चमत्कारिक प्रदर्शन करेल. आम्हाला हे कळाले आहे की, तुमच्या हातात जर विकेट्स असतील तर तुम्ही सामना नक्की जिंकू शकता.” ललितला रिषभ पंत, स्टोइनिस आणि शिमरन हेटमायर यांच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आले होते.
तसेच त्याने अमित मिश्राबद्दल म्हटले की, “जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्यावर प्रेशर होता. त्यानंतर मिशी भाईने (अमित मिश्रा) आम्हाला सामन्यात पुनरागमन करून दिले. आम्ही सुरुवातीपासूनच मुंबईला १४० -१५० धावांपर्यंत थांबवण्याच्या प्रयत्नात होतो.”
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती.तसेच ईशान किशनने २६ आणि सूर्यकुमार यादवने २४ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच स्टीव्ह स्मिथने देखील ३३ धावांचे योगदान दिले होते. शेवटी ललित यादवने नाबाद २२ आणि शिमरन हेटमायरने नाबाद १३ धावा करत हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“जेव्हाही हार्दिक पंड्या मैदानावर येतो, तेव्हा-तेव्हा मी त्याला बाद करतो”
सेहवागने पाहिजे ते माग म्हटले असता मिश्रा म्हणाला होता, ‘फक्त माझी पगार वाढवा’; वाचा तो किस्सा