भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला या सामन्यात आघाडीवर आणले आहे.
मात्र यात गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचीही तोलामोलाची साथ मिळत आहे. गोलंदाज निर्माण करत असलेल्या संधी क्षेत्ररक्षक अचूकतेने पकडत असल्याने भारताला लवकर विकेट मिळवणे शक्य झाले आहे. मात्र या झेलांमध्येही एका झेलाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या खराब यष्टिरक्षणाने टीकेचा सामना करावा लागत असलेल्या रिषभ पंतने या सामन्यात एक लाजवाब झेल घेत लक्ष वेधून घेतले आहे.
सुपरमॅन पंत
रिषभ पंतने हा झेल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर टिपला. मोहम्मद सिराज ३९व्या षटकात गोलंदाजीला आला असतांना पहिलाच चेंडू त्याने लेग स्टंपवर टाकला. मात्र तो चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या ओली पोपच्या ग्लोव्जला लागून पंतच्या डाव्या बाजूने चालला होता.
चेंडू वेगात असल्याने तो सीमारेषेपार जाईल असेच सगळ्यांना वाटले होते. मात्र पंतनी हवेत सूर मारत अप्रतिम झेल घेतला. एका हाताने त्याने घेतलेला हा झेल पाहून गोलंदाजी करत असलेल्या सिराजसह सगळेच संघ सहकारी खुश झाले. विशेषतः यष्टिरक्षणावरुन सध्या त्याच्यावर टीका होत असताना त्याने हा झेल घेतल्याने सगळ्यांनीच पंतचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/AbhiTestlover/status/1360865374791626752
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ३२९ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने गोलंदाजीतून सामन्यावर पकड मिळवली. पहिल्या सत्रात चार आणि दुसऱ्या सत्रात चार विकेट घेतल्याने इंग्लंडच्या संघाला पिछाडीवर ढकलण्यात यश मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडची ९ बाद १३१ अशी अवस्था झाली आहे. भारताच्या धावासंख्येपासून ते अजूनही १९८ धावांनी पिछाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : स्टोक्स पुन्हा ठरला अश्विनची शिकार, जादूई फिरकीवर झाली दांडी गुल
INDvsENG 2nd Test Live : ऑली स्टोनला बाद करत अश्विनने दिला ८ वा धक्का; दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडच्या ८ बाद १०६ धावा
इंग्लंडचा संघ अवघ्या दिडशे धावसंख्येवर होणार ऑलआऊट; दिग्गजाने केली भविष्यवाणी