भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant ) दीड वर्षाच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. आधी टी20 विश्वचषक आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला. पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा मिळवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागेल. प्रमुख यष्टीरक्षकाच्या जागेसाठी त्याला तीन खेळाडूंशी स्पर्धा करावी लागेल.
पंत याने डिसेंबर 2022 मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याच वर्षाच्या अखेरीस त्याचा अपघात झाल्यामुळे त्याला दीड वर्ष मैदानापासून दूर रहावे लागले. अखेर आयपीएल 2024 मधून त्याने पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर तो टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य देखील बनला. मात्र, कसोटी संघातील जागेसाठी त्याला लढत द्यावी लागेल.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड दुलिप ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतला ध्रुव जुरेल, केएल राहुल व ईशान किशन यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. या सर्व यष्टीरक्षकांना दुलिप ट्रॉफी खेळण्याची सूचना बीसीसीआयने केली आहे.
पंत संघाचा भाग नसताना केएस भरत याला सर्वाधिक संधी मिळाली. मात्र, तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता त्याची संघात निवड होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुल याची कामगिरी चांगली राहिलेली. तर, ईशान किशन केवळ वेस्ट इंडिज दौऱ्यावर छाप पाडू शकलेला. चालू वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ध्रुव जुरेल याने शानदार यष्टीरक्षण व फलंदाजी करत लक्ष वेधून घेतले होते.
सर्व घडामोडी पाहता पंत याला केएल राहुल व ध्रुव जुरेल यांच्याकडून तगडी स्पर्धा मिळेल. अखेरीस अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काय निर्णय घेते?, हे पाहणे महत्त्वाचे असेल.