भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारत (19 सप्टेंबर) रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, आतापासूनच निवडीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भारतासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांच्या निवडीबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांगलादेश दौऱ्यावर या दोघांपैकी कोणाला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं पंत आणि जुरेल यांच्यातील चर्चेबद्दल इनसाइडस्पोर्ट्सशी चर्चा केली. त्यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “ध्रुव जुरेलसोबत जायचे की पंतला परत आणायचे हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. दुलीप ट्रॉफीतील त्यांच्या कामगिरीवरही ते अवलंबून असेल. पंत त्याच्या कार अपघातानंतर लाल बॉल क्रिकेट खेळला नाही आणि दुसरीकडे ध्रुव जुरेलनं देखील चांगली कामगिरी केली आहे.”
पुढे बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाला, “एका दिवसात 90 षटकं होईपर्यंत विकेटकीपिंग करणं खूप कठीण काम आहे. मात्र, एनसीए फिजिओला पंतबद्दल विश्वास आहे की त्याला कीपिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याचा कसोटी फिटनेस आपल्याला पाहायला मिळेल. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं त्याच्यासाठी आणि भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं 33 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 43.67च्या सरासरीनं 2,271 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 73.63 राहिला आहे. कसोटीमध्ये त्यानं 11 अर्धशतकांसह 5 शतकं झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 राहिली आहे.
ध्रुव जुरेलच्या (Dhruv Jurel) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर यंदाच्याच वर्षी इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले. 3 सामन्यांच्या 4 डावात फलंदाजी करताना त्यानं 63.33च्या सरासरीनं 190 धावा केल्या. 3 सामन्यात त्यानं 1 अर्धशतक झळकावलं. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 90 आहे.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली अशी टी20 मॅच, एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर्स, कोण जिंकलं?
मँचेस्टर कसोटीत प्रेक्षकाने चोरली लाइमलाइट, एका हातात बिअरचा ग्लास अन् दुसऱ्या हाताने टिपला शानदार झेल
इशान किशनने वाढवली प्रशिक्षक गंभीरची डोकेदुखी! फलंदाजीनंतर गोलंदाजीत करतोय कमाल