लखनऊ सुपर जायंट्स संघाचं आयपीएल 2025 प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न उध्वस्त झालं आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांच्याच घरेलू मैदानात मिळालेल्या पराभवानंतर लखनऊ संघाचं अंतिम 4 मध्ये पोहोचण्याच्या आशांवर हैदराबादने पाणी फिरवले आहे. लखनऊच्या फलंदाजांनी हैदराबाद विरुद्ध चांगलं प्रदर्शन केलं, पण संघाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा लाजिरवाणं प्रदर्शन करण्यात कोणतीही कमी ठेवली नाही. प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने संघाच्या कमतरतेचा खुलासा केला आहे, जाणून घ्या तो काय म्हणाला?
हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर कर्णधार रिषभ पंत म्हणाला, खरं सांगायचं झालं तर हा हंगाम आमच्यासाठी सर्वात चांगला हंगाम ठरला असता पण स्पर्धेच्या सुरुवातीलाच आम्हाला झटके बसले. आमचे काही खेळाडू दुखापती झाले. याबद्दल संघाने जास्त काही न बोलण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही जसं खेळण्याच्या रणनीती आखल्या होत्या, जर त्या प्रकारे आम्ही खेळलो असतो तर गोलंदाजी अधिक मजबूत झाली असती. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे काही गोष्टी तुमच्या पक्षात येतात तशाच कधी येत नाहीत. आम्ही ज्या प्रकारे खेळलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही नकारात्मक विचार न करता हा हंगाम सकारात्मक विचारांनी आमच्या सोबत घेऊन जाऊ.
रिषभ पुढे म्हणाला, आमची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि या हंगामातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे, आमची फलंदाजी राहिली. तसेच आमच्या काही गोलंदाजांनी काही सामन्यात चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना म्हणावं तितकं यश भेटलं नाही. आम्हाला माहिती आहे की, आम्ही 10 धावा कमी केल्या, हंगामाच्या पहिल्या सत्रात शानदार प्रदर्शन केलं. पण दुसऱ्या सत्रात आम्ही दुसऱ्या संघाच्या तुलनेत मागे पडत गेलो. दिग्वेश राठीने पहिल्याच हंगामात चांगली गोलंदाजी केली.






