राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मंगळवारी आयपीएल 2026 मधील 64वा सामना जयपूर येथे खेळवला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी राजस्थानसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे.
मात्र, राजस्थानला मोठा धक्का बसला असून नियमित कर्णधार रियान पराग दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. त्याच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल संघाचे नेतृत्व करत आहे.
नाणेफेकीनंतर यशस्वीने सांगितले की, रियानला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो लवकर बरा होईल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामात रियानने 11 सामन्यांत 258 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने 26 चेंडूत 51 धावांची झंझावाती खेळी केली होती.
कर्णधारपदाबद्दल बोलताना यशस्वी म्हणाला, “राजस्थान रॉयल्ससारख्या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विकेट चांगली दिसत आहे आणि नंतर दव पडू शकते, त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील दुखापतीतून सावरत असल्याची माहिती यशस्वीने दिली. “जड्डू भाई लवकरच तंदुरुस्त होतील,” असे तो म्हणाला.
राजस्थानने या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत. संघात संदीप शर्मा, सुशांत मिश्रा आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, लखनऊने मोहम्मद शमीच्या जागी मोहसिन खान आणि आयुष बडोनीच्या जागी एडन मार्करमला संघात स्थान दिले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला, “ही फलंदाजीसाठी चांगली विकेट आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलो असलो तरी प्रत्येक सामना जिंकण्याच्या हेतूनेच खेळत आहोत.”






