---Advertisement---

“सीएसकेच रैनावर पहिली बोली लावणार”; संघसहकार्याने व्यक्त केला आशावाद

On: गुरूवार, डिसेंबर 2, 2021 10:16 PM
RAINA
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे रणशिंग फुंकले गेले आहे. स्पर्धेतील मूळ आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रक्रियेत सर्व संघांनी मिळून २७ खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखले. गत हंगामाच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने या रिटेंशनमध्ये कर्णधार एमएस धोनीसह रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड व मोईन अली यांना कायम केले. मात्र, संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी फलंदाज सुरेश रैना याला करारमुक्त करण्यात आले. आता याविषयी चेन्नईचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा याने महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला उथप्पा?
आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून चेन्नईने भारताचा अनुभवी सलामीवीर रॉबीन उथप्पा याला ट्रेड केलेले. त्याने एका मुलाखतीत बोलताना चेन्नईच्या रिटेंशनविषयी महत्त्वपूर्ण विधान केले. तो म्हणाला,
“मला हे पक्के माहीत आहे की, सुरेश रैना पहिला व्यक्ती असेल ज्यासाठी चेन्नई लिलावात सर्वाधिक जोर लावेल. फाफ डू प्लेसिसला करारमुक्त करणे सोपे राहिले नसेल. मोईन अलीला त्याच्या अष्टपैलू खेळासाठी संघात कायम केले गेले असेल असे मला वाटते.”

रैनाविषयी बोलताना तो म्हणाला,
“रैना संघासाठी मागील दहा बारा वर्षापासून प्रमुख खेळाडू राहिला. अनेकदा त्याने संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलीय.”
रैना हा २००८ ते २०१५ पासून चेन्नईचा भाग होता. त्यानंतर दोन वर्षे त्याने गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो पुन्हा चेन्नई संघात सामील झाला.

चेन्नईने केले या चौघांना रिटेन
चेन्नईने २०२२ आयपीएलसाठी आपल्या चार प्रमुख खेळाडूंना रिटन केले. अष्टपैलू रवींद्र जडेजा याला १६ कोटी रुपये देत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू, कर्णधार एमएस धोनीला १२ कोटीत रुपयात दुसऱ्या क्रमांकाचा, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला ८ कोटींसह तिसऱ्या व युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला सहा कोटींसह चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून रिटेन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---