येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात म्हणजे २००७ साली भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत इतिहास घडवला होता. त्यावेळी दोन वेळा भारत विरुद्ध पाकिस्तान सामने झाले होते. पहिल्यांदा साखळी फेरीत आणि नंतर अंतिम सामन्यात हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने होते. त्यावेळी साखळी फेरीतील सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटल्याने बॉल आऊट नुसार या सामन्याचा निकाल लागला होता.
दरम्यान, रॉबिन उथप्पाने त्यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. नुकताच त्याने २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धतील एमएस धोनीसोबतचा किस्सा सांगितला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना जेव्हा बरोबरीत सुटला होता. त्यावेळी बॉल आऊटमध्ये रॉबिन उथप्पा देखील होता. याबाबत बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “ज्यावेळी हा सामना बरोबरीत सुटला होता, त्यावेळी आम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेलो होतो. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर आम्हाला कळाले होते की, सामन्याचा निकाल बॉल आऊटने लागणार आहे. त्यावेळी मी धावत एमएस धोनीकडे गेलो आणि म्हटले की, ‘मला गोलंदाजी करायची आहे.’ त्याने क्षणातच म्हटले की, ‘ठीक आहे, कर तू गोलंदाजी.”
तसेच रॉबिन उथप्पा पुढे म्हणाला की, “मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते की, तो एक चांगला कर्णधार होता. जर तुमच्याकडे कौशल्य आणि क्षमता असेल, तर तो नक्कीच त्याचे समर्थन करायचा. त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात ते दाखवून दिले होते.”
“भारतीय संघातील खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली चेंडू यष्टीला मारण्याचा सराव करायचे. माझ्यासह रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग देखील चेंडू यष्टीला मारायचा सराव करत असे. मला विश्वास होता की, जर संधी मिळाली, तर मी हे करू शकतो. संधी मिळताच मी ते करूनही दाखवले.” असे रॉबिन उथप्पा म्हणाला.
#OnThisDay in 2007, India v Pakistan at #WT20 ended with scores level, and India won a bowl-out 3-0 in a thrilling tie in Durban! pic.twitter.com/dXf27ruAm8
— ICC (@ICC) September 14, 2017
या सामन्यात भारतीय संघाकडून रॉबिन उथप्पा, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी चेंडू यष्टीला मारला होता. तर पाकिस्तान संघाकडून एकाही गोलंदाजाला चेंडू यष्टीला मारण्यात यश आले नव्हते. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला होता. तसेच अंतिम सामन्यात देखील पाकिस्तान संघाला पराभूत करत विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वी शॉ आणि इरफान पठाणने शेअर केलेले फोटो पाहून पोटधरून हसाल
सीपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर विराटचा ‘हा’ भिडू आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कशी राहिली आहे कामगिरी
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेले ‘तीन’ शिलेदार, कोणालाही नव्हती अपेक्षा