भारतीय संघाने 1983 साली जेव्हा पहिल्यांदा विश्वचक आपल्या नावावर केला, तेव्हा त्यामधील अनेक भारतीय खेळाडू चाहत्यांसाठी एकप्रकारे हिरो ठरले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वापासून ते सुनील गावसकरांच्या फलंदाजीपर्यंत सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे रॉजर बिन्नी बुधवारी (दि. 19 जुलै) आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
भारताचे पहिले अँग्लो इंडियन रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी एक खेळाडू म्हणून संघाला विश्वचषक जिंकून देण्यात योगदान तर दिलेच. शिवाय, 2000 साली एक प्रशिक्षक म्हणून मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असणाऱ्या 19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वविजेताही बनविण्यातही मोलाचे योगदान दिले
एक प्रशिक्षक म्हणून केला अनेक आरोपांचा सामना
खेळाडू आणि प्रशिक्षक यानंतर बिन्नी यांनी संघ निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. तरीही 2014मध्ये ते निवडकर्ता असताना त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याची भारतीय संघात निवड झाली होती.
त्यावेळी त्यांच्यावर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, की बापाने मुलाची संघात निवड केली आहे. यानंतर बिन्नी यांनी आपले मत स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते, “जेव्हा- जेव्हा मुलाचे नाव निवडण्यासाठी (सिलेक्शन) आले, त्यावेळी मी बैठकीतून बाहेर गेलो होतो. स्टुअर्टची निवड समितीतील इतर सदस्यांनी केली आहे आणि हे पूर्णत: निष्पक्ष पद्धतीने झाले आहे.”
रॉजर बिन्नी होते 1983च्या विश्वचषकाचे हिरो
बिन्नी (Roger Binny) यांचे योगदान इतके महत्त्वाचे होते, की जर बिन्नी नसते, तर भारतीय संघाला विश्वचषक जिंकणे सोडा अंतिम सामन्यातही पोहोचता आले नसते. कारण बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 षटकात 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारण्यास भाग पाडले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 247 धावा केल्या होत्या. परंतु बिन्नीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 129 धावांवर संपुष्टात आला होता.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामनाही भारतीय संघाने 6 विकेट्सने जिंकला होता. त्यामध्ये बिन्नी यांनी 2 विकेट्स घेतल्या होत्या. आता अंतिम सामन्यात भारतीय संघ बलाढ्य आणि 2 वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला टक्कर देणार होता.
अंतिम सामन्यात भारतीय संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नव्हती. ते पाहून असे वाटत होते की आता वेस्ट इंडिज संघ पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरते की काय. कारण, नियमित अंतराने विकेट्स गमावत भारतीय संघाचा डाव 183 वर संपुष्टात आला होता.
तसेच, 183 ही धावसंख्या वेस्ट इंडिज संघासाठी फार काही मोठी धावसंख्या नव्हती. परंतु भारतीय संघाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पुरता घाम फोडला. अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात बिन्नी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. बिन्नी यांनी अंतिम सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना केवळ 23 धावा देत 1 विकेटही घेतली. अशाप्रकारे भारताने विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हे वाचलंच पाहिजे! विश्वचषक 1983 स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ अन् युवराजलाही दिलेलं प्रशिक्षण
फ्लॉवर यांच्या कोचिंगची जादू कायम! लखनऊने नारळ दिल्यानंतर ‘या’ आयपीएल संघाकडून ऑफर