भारताने काल(22 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर आज(23 ऑक्टोबर) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्माने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.
त्याने 12 स्थानांची मोठी झेप घेत फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 10 वे स्थान मिळवले आहे.
त्यामुळे तो आयसीसी क्रमवारीत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली आणि गौतम गंभीर नंतरचा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित सध्या आयसीसी क्रमवारीमध्ये कसोटीत दहाव्या, वनडेत दुसऱ्या आणि टी20मध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
विराटही सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील आयसीसी क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आहे. तो कसोटीमध्ये दुसऱ्या, वनडेमध्ये पहिल्या आणि टी20 मध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर याआधी भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही तीन्ही क्रिकेट प्रकाराच्या आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याचा पराक्रम केला आहे. तो कसोटी आणि टी20मध्ये अव्वल क्रमांकावर होता तर वनडेमध्ये आठव्या क्रमांकावर होता.






