यूएई येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात ब गटातील भारत आणि अफगानिस्तान हे संघ समोरासमोर आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयाची पायाभरणी करणाऱ्या रोहित शर्माने एका नव्या विक्रमाच्या दिशेने आगेकूच केली.
रोहितचे शानदार अर्धशतक
पहिल्या दोन सामन्यात पुरता अपयशी ठरलेला भारतीय संघाचा उपकर्णधार व वरिष्ठ सलामीवीर रोहित शर्मा याने या सामन्यात आपल्या लाजवाब फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने १५७ च्या स्ट्राईक रेटने ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार व तीन षटकार लगावत ७४ धावांची अप्रतिम खेळी केली. रोहितचे हे २३ वे टी२० अर्धशतक ठरले.
बनविला हा नवा विक्रम
अफगाणिस्तान विरुद्धचे हे अर्धशतक रोहितचे मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेतील (टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी) २१ वी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी ठरली. आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावांच्या खेळीचा करण्याची कामगिरी सचिन तेंडुलकर व विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्या नावे आहेत. या दोघांनीही प्रत्येकी २३ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.
भारताचा धावांचा डोंगर
सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी जबरदस्त सलामी दिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढत या दोघांनी १४.४ षटकात १४० धावा चोपल्या. राहुलने ६९ तर रोहितने ७४ धावांची खेळी केली. अखेरीस हार्दिक पंड्या व रिषभ पंत यांनी अवघ्या २१ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली. हार्दिक ३५ व पंत २७ धावांवर नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड टीम इंडियाचे २६ वे महागुरू, आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची लागलीय वर्णी; वाचा संपूर्ण यादी
‘जेवढा लांब षटकार कोहली मारतो, त्यापेक्षा लांब मारू शकतो,’ ९० किलोच्या ‘या’ खेळाडूचे विराटला आव्हान
राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक