इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या २ दिवसांत म्हणजे १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामने उर्वरित हंगामाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात भारतात या हंगामाचा पहिला टप्पा खेळवण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे २९ सामन्यांनंतर ही लीग अर्ध्यात स्थगित करावी लागली होती.
अजून आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ३१ सामने बाकी आहेत. यादरम्यान बऱ्याचशा क्रिकेटपटूंना अद्वितीय विक्रम नोंदवण्याची किंवा मोडण्याची संधी असेल. मात्र आयपीएल एक असा लाजिरवाणा विक्रम आहे, जो काही क्रिकेटपटू आपल्या नावावर करु शकतात. हा विक्रम आहे, आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याच्या नकोशा विक्रमात १ किंवा २ नव्हे तर चक्क ५ खेळाडू संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. यामध्ये हरभजन सिंग, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू आतापर्यंत १३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
त्यामुळे यांपैकी एकही खेळाडू जर युएई टप्प्यातील सर्वांआधी शून्यावर बाद झाला तर, तो या नकोसा विक्रमात इतरांना मागे सोडत हा विक्रम आपल्या नावावर करेल. त्यातही रोहित किंवा रायुडू सर्वप्रथम ही नकोशी कामगिरी करु शकतात. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे.
या ५ खेळाडूंनंतर दुसऱ्या स्थानावर ४ खेळाडू संयुक्तपणे विराजमान आहेत. यामध्ये पियुष चावला, मनदिप सिंग, मनिष पांडे यांच्यासह गौतम गंभरीचाही समावेश आहे. हे खेळाडू १२ वेळा भोपळाही न फोडता पव्हेलियनला पोहोचले आहेत. त्यांच्यानंतर विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक ११ वेळा शून्यावर बाद होत तिसऱ्या स्थानावर आहेत.