भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने गुरुवारी (12 ऑगस्ट) लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वादळी खेळी केली. वेगवान खेळी खेळत त्याने लोकेश राहुलसह भारतीय संघासाठी सलामीला शतकी भागीदारी केली. कसोटीत पदार्पण करताना रोहितने सलामीला 317 धावांची भागीदारी केली होती.त्यानंतर आता राहुलसोबत सलामीला शतकी भागीदारी केली आहे. यासह रोहित-राहुलच्या जोडीने भारतीय संघाचा 69 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.
69 वर्षांपूर्वी, जून 1952 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर विनू मांकड आणि पंकज रॉय यांनी सलामीला 106 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर, हा विक्रम फारूख इंजिनिअर आणि सुनील गावस्कर यांनी जून 1974 मध्ये मोडीत काढला होता. त्यांनी सलामीला 131 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय सलामी जोडीला क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या या मैदानावर शतकी भागिदारीचा आकडा पार करता आला नाही.
मात्र रोहित आणि राहुलच्या जोडीने लॉर्ड्सवर चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वोच्च भारतीय सलामी भागीदारीचा विनू मांकड आणि पंकज रॉय यांचा विक्रम मोडला आहे. पण गावस्कर आणि फारुख इंजिनिअर यांचा विक्रम मोडण्याची संधी त्यांच्याकडून थोडक्यात हुकली.
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला 126 धावांच्या धावसंख्येवर पहिला धक्का बसला. जर रोहित आणि राहुलने येथून आणखी 6 धावा केल्या असत्या तर त्यांनी गावस्कर आणि इंजिनिअरचाही विक्रम मोडला असता, पण त्यांनी ही संधी गमावली. रोहित शर्मा 83 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्रिफळाचीत केले.
त्याचबरोबर रोहित शर्माला परदेशात पहिले शतक झळकावण्याची संधी देखील होती, जी हुकली. रोहित शर्माने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत 7 शतके लगावली आहेत. पण ही सर्व शतके त्याने भारतात केली आहेत.
दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2019 ला रोहित शर्माने सलामीवीर म्हणून कसोटी स्वरूपात पदार्पण केले होते. या पहिल्या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माने मयंक अग्रवालसोबत 317 धावांची सलामी भागीदारी केली होती. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता. भारतीय संघाने हा सामना 203 धावांनी जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स मैदानावर रोहितचा ७६ मीटरचा लांबलचक सिक्स अन् चाहत्यांचा आनंद गगनात; केला भरपूर जल्लोष
चौकारानंतर चौकार खेचत रोहितने सॅम करनची केली ‘दुर्दशा’, व्हिडिओ जोरदार व्हायरल
पुजाराची विकेट अँडरसनसाठी ठरली विक्रमी, भारताविरुद्ध ‘ही’ किमया साधणारा ठरला पहिलाच गोलंदाज