१० नोव्हेंबर रोजी आयपीएल २०२० च्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सचे पटकावले. हे त्यांचे आयपीएलमधील ५ वे विजेतेपद ठरले. त्यामुळे ५ आयपीएल विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. विशेष म्हणजे ही पाचही विजेतीपदं मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिळवली. त्यामुळे तो देखील आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. खास गोष्ट अशी की रोहितने आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात कर्णधाराला साजेशी अशी ६८ धावांची खेळीही साकारली.
या विजेतेपदामुळे रोहितचे आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते पुन्हा सर्वांसमोर आले. रोहितसाठी नोव्हेंबर महिना अनेक गोष्टींसाठी खास आहे.
असे आहे रोहित आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते:
वनडेतील द्विशतके- रोहितने वनडे क्रिकेटमध्ये एकूण तीन द्विशतके केली आहेत. यातील दोन द्विशतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत. तसेच त्याने त्याचे वनडेतील पहिले द्विशतकही नोव्हेंबर महिन्यातच केले होते.
त्याने २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर एक वर्षांनी १३ नोव्हेंबर २०१४ ला वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारताना २६४ धावांची तूफानी खेळी केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण आणि पहिली ३ कसोटी शतके:
रोहितने ६ नोव्हेंबर २०१३ मध्ये विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १०८ वनडे सामने खेळल्यानंतर ७ वर्षांनी रोहित शर्माला क्रिकेटचा हा प्रकार खेळण्याची संधी मिळाली होती.
या सामन्यात रोहितने पहिल्या डावात ३०१ चेंडूत १७७ धावांची धमाकेदार खेळी करत कसोटीतील पहिले शतक केले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यातही रोहितने १११ धावांची खेळी करत सलग दुसरे कसोटी शतक केले.
तसेच त्यानंतर रोहितने २६ नोव्हेंबर २०१७ ला श्रीलंके विरुद्ध कसोटीतील तिसरे शतक केले. हे शतक त्याने करताना त्याने नाबाद १०२ धावांची खेळी केली होती.
ही रोहितची कसोटी कारकिर्दीतील पहिली ३ शतके होती. ही पहिली तीन्ही शतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत.
चौथे आंतरराष्ट्रीय टी२० शतक:
रोहितने ६ नोव्हेंबर २०१८ आंतरराष्ट्रीय टी२० मधील चौथे शतक केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला. अजूनही कोणाला आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४ शतके करता आलेली नाही.
आयपीएलचे पाचवे विजेतेपद:
रोहित शर्मा २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याने या संघाचे यशस्वी नेतृत्व करताना कर्णधार म्हणून १० नोव्हेंबर २०२० ला मुंबई इंडियन्सला पाचवे आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे कर्णधार म्हणून ५ तर खेळाडू म्हणून ६ विजेतीपदं मिळवणारा रोहित एकमेव खेळाडू ठरला. याआधी रोहितने २००९ ला डेक्कन चार्जर्सकडून खेळाडू म्हणून पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते.
वाचा –
रोहित शर्माच्या २६४ धावांच्या खेळी नंतरही ‘ते’ होते नाखूश
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’