अहमदाबाद| शुक्रवारी (११ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) अखेरचा आणि तिसरा सामना (3rd ODI) पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजीमध्ये भारताच्या वरच्या फळीकडून निराशा पाहायला मिळाली. पण असे असले, तरी शिखर धवन आणि रोहित शर्मा (Shikhar Dhawan and Rohit Sharma) या सलामीवीरांच्या जोडीने एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या सामन्यासाठी शिखर धवनचे पुनरागमन झाले होते. तो या मालिकेपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. याच कारणामुळे त्याला पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते. परंतु, त्याने तिसऱ्या सामन्यातून पुनरागमन केले.
तिसऱ्या सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यामुळे ही जोडी २०२२ मध्ये वनडेत पहिल्यांदाच सलीमीला उतरलेली दिसली. त्याचमुळे त्यांच्या नावावर भारतासाठी सलग १० वर्षे वनडेत सलामीला फलंदाजी करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. असा पराक्रम करणारी त्यांची पहिलीच जोडी आहे. हे दोघेही २०१३ पासून एकत्र सलामीला फलंदाजी करत आहेत. त्यांनी सर्वात पहिल्यांदा ६ जून २०१३ रोजी सलामीला फलंदाजी केली होती.
तसेच शुक्रवारी झालेल्या सामन्यापूर्वी रोहित आणि शिखर २८ मार्च २०२१ रोजी एकत्र सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे हे दोघेही एकत्र सलामीला दिसले नव्हते. पण, अखेर तब्बल ३२० दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा सलामीला पाहायला मिळली.
यापूर्वी विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी सलग ९ वर्षे भारतासाठी सलामीला फलंदाजी करण्याचा विक्रम केला होता. त्यांनी २००५ ते २०१३ दरम्यान सलग ९ वर्षे भारतासाठी सलामीला फलंदाजी केली होती. त्यापूर्वी त्यांनी २००३ मध्ये देखील सलामीला फलंदाजी केली होती. मात्र, २००४ मध्ये हे दोघेही एकत्र सलामीला उतरले नव्हते.
धवन-रोहित स्वस्तात बाद
शुक्रवारी धवन आणि रोहित यांची जोडी फारकाळ मैदानावर टिकली नाही. धवन १० धावा करून ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरकडे झेल देऊन बाद झाला, तर रोहितला १३ धावांवर अल्झारी जोसेफने त्रिफळाचीत केले. त्यापाठोपाठ अल्झारी जोसेफने विराट कोहलीलाही शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली होती. मात्र, नंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या जोडीने भारताचा डाव सांभाळला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या आजी-माजी कर्णधारांची घोर निराशा, संपूर्ण मालिकेत विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाचे बनले गिऱ्हाईक
‘अच्छा चलता हूँ…’, म्हणत जाफरने घेतला पंजाब किंग्सचा निरोप, संघासाठी निभावत होता ‘ही’ भूमिका
INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर