वेस्ट इंडिज विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (९ फेब्रुवारी ) रोमांचक सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघावर ४४ धावांनी विजय मिळवला. यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. ही पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिलीच मालिका आहे. त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यात त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, हा सामना शेवटच्या टप्प्यात असताना वेस्ट इंडीजचा फलंदाज ओडियन स्मिथ तुफान फटकेबाजी करत होता. त्यामुळे भारतीय खेळाडू सतर्क झाले होते. ४५ व्या षटकात रोहित शर्मा ओडियन स्मिथसाठी क्षेत्ररक्षण सजवत होता. त्यावेळी युझवेंद्र चहल सांगितलेल्या ठिकाणी धावत न जाता चालत जात होता. हे पाहून रोहित शर्मा भलताच चिडला. त्यावेळी रोहित शर्माने युझवेंद्र चहलला म्हटले की, “काय झालय तुला? धावत का नाहीयेस… चल जा तिकडे…” रोहितचे हे बोलणे स्टंप माईकमध्ये कैद झाले आहे.
हे पाहून चाहत्यांना २०१९ मध्ये झालेली घटना आठवली. त्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात संथ गतीने धावण्यावरून रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर चिडल्याचे पाहायला मिळाले होते. तर झाले असे होते की, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा एकत्र फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराला एक धाव घेण्यास सांगितले होते. परंतु चेतेश्वर पुजाराने त्यावेळी धाव घेण्यास नकार दिला होता. हे पाहून रोहित शर्माला राग आला होता. त्यावेळी त्याने ‘भाग पुज्जी भाग’ असे म्हटले होते. हा व्हिडिओ देखील भरपूर व्हायरल झाला होता.
rohit body'ing chahal is a constant 😭😭 https://t.co/75vYsYgK0d
— rea (@reaadubey) February 9, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
एकाच सामन्यावरून कर्णधार रोहितने काढलं रिषभचं ‘माप’, पुढील वनडेत सलामीला पाठवण्याबाबत म्हणाला…
विंडीज क्रिकेटरच्या घरी जन्मली छोटी परी, भारतातील ‘ईडन गार्डन’वरून केले लेकीचे नामकरण; वाचा कारण