टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने केएल राहुलबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, रोहित शर्माच्या प्रभावामुळेच केएल राहुलच्या फलंदाजीत मोठा बदल पाहायला मिळाला. तो म्हणाला की, गेल्या वर्षी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडे केएल राहुलच्या फलंदाजीत आक्रमकता आणण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव झाल्यानंतर नायरला ही जबाबदारी सोडावी लागली.
‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी बोलताना नायर म्हणाला, “ही भूमिका स्वीकारताना मला आठवतंय की रोहितने मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती, तो मला केएल सोबत काम करताना बघू इच्छित होता आणि त्याच्या फलंदाजीत अधिक आक्रमक दृष्टीकोन आणण्याचं काम मला दिलं होतं, जेणेकरून तो सर्वोत्तम कामगिरी करू शकेल.” गेल्या एका वर्षात राहुलने चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 डावांमध्ये त्याने 276 धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही खालच्या फळीत फलंदाजी करताना त्याने पाच सामन्यांत 140 धावा केल्या.
नायर पुढे म्हणाला, “रोहितला विश्वास होता की केएल राहुल चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड कप, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावेल.” जरी भारताने लीड्समध्ये पहिली कसोटी गमावली, तरी राहुलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 42 धावा आणि दुसऱ्या डावात भक्कम 137 धावा केल्या.
नायरने स्पष्ट केलं की राहुलमधील बदलाची सुरुवात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी झालेल्या प्रशिक्षण सत्रांपासून झाली होती. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी निर्णायक होता. जर तिथे तो धावा करू शकला नसता, तर कदाचित ही त्याची शेवटची मालिका ठरली असती, कारण तो आधीच टी20 संघातून बाहेर होता. पण अनेक तासांच्या चर्चेनंतर त्याने माझ्यावर विश्वास टाकला.” त्यानंतर आयपीएल असो वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, केएल राहुल सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.






