लंडन। गुरुवारपासून (२ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खास विक्रम केला आहे. याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
ओव्हल कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद ४३ धावा केल्या. यावेळी रोहित २० धावांवर नाबाद राहिला. या नाबाद खेळीबरोबरच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ ८ वा खेळाडू ठरला आहे.
रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर (३४३५७), राहुल द्रविड (२४२०८), विराट कोहली (२३०४९*), सौरव गांगुली (१८५७५), एमएस धोनी (१७२६६), विरेंद्र सेहवाग (१७२५३) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१५५९३) यांनी हा कारनामा केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या या भारतीय खेळाडूंपैकी केवळ विराट आणि रोहित सक्रिय क्रिकेटपटू आहेत, अन्य सर्व ६ जणांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
सर्वात जलद १५ हजार धावा करणारा ५ वा भारतीय खेळाडू
रोहितने या १५ हजार धावा त्याच्या कारकिर्दीतील ३९६ व्या आंतरराष्ट्रीय डावात फलंदाजी करताना केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५ हजार धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित आता ५ व्या क्रमाकंवार आला आहे. त्याने सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन आणि एमएस धोनी यांना मागे टाकले आहे.
या यादीत अव्वल क्रमांकवार विराट कोहली आहे. विराटने ३३३ डावात १५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ३५६ डावात १५ हजार धावांचा टप्पा गाठला होता.
सर्वात जलद १५ हजार धावा करणारे भारतीय खेळाडू
३३३ डाव – विराट कोहली
३५६ डाव – सचिन तेंडुलकर
३६८ डाव – राहुल द्रविड
३७१ डाव – विरेंद्र सेहवाग
३९६ डाव – रोहित शर्मा
४०० डाव – सौरव गांगुली
४३४ डाव – मोहम्मद अझरुद्दीन
४५२ डाव – एमएस धोनी
रोहितच्या १५ हजार धावा
रोहितने त्याच्या कारकिर्दीत वनडेत ९२०५ धावा केल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने २८६४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कसोटीत त्याच्या नावावर २९४० धावा (३ सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी) आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीला माफी नाही! भारत-इंग्लंड सामन्यात सलग तिसऱ्यांदा घुसणाऱ्या जार्वोवर अटकेची कारवाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद २३ हजार धावा करणारे ३ फलंदाज, पहिल्या दोन क्रमांकावर भारतीयांचा कब्जा