मुंबई । रोहित शर्मा सामन्यात खेळला आणि कोणताही विक्रम होऊ शकला नाही, असे आजकाल होऊच शकत नाही. बुधवारी( 22 सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितची बॅट पुन्हा चालली. त्याने 54 चेंडूत 80 धावांची तडफदार खेळी करत मुंबईला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा पहिला विजय मिळवून दिला. या शानदार खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह, त्याने आयपीएलमधील सर्वाधिक सामनावीर पुरस्काराच्या बाबतीत एमएस धोनीला मागे टाकले.
आयपीएलमधील सर्वाधिक वेळा सामनावीर
रोहित आयपीएलमध्ये 18 व्या वेळी सामनावीर ठरला. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला इतक्या वेळा हा पुरस्कार मिळालेला नाही. याआधी धोनी आणि रोहितने प्रत्येकी 17 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला होता. पण आता रोहितने बुधवारी कोलकाता विरुद्ध सामनावीर पुरस्कार मिळवत धोनीला मागे टाकले आहे.
तसे, आयपीएलमध्ये जर आपण सर्वात जास्त सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंबद्दल बोललो तर ख्रिस गेलच्या नावावर हा विक्रम आहे. हा पुरस्कार त्याने 21 वेळा जिंकला आहे. यानंतर एबी डिव्हिलियर्स येतो. त्याच्या नावावर 20 सामनावीर पुरस्कार आहेत. या यादीत आता रोहित शर्मा आता तिसर्या क्रमांकावर आला आहे. तर धोनी आणि डेव्हिड वॉर्नर 17 सामनावीर पुरस्कारांसह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत. युसुफ पठाणला 16 वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
आयपीएलमध्ये 200 षटकार
इंडियन प्रीमियर लीगच्या 5व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 80 धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले. रोहित शर्माने केकेआरच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात रोहित शर्माने आयपीएलचे 200 षटकार पूर्ण केले. आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा रोहित शर्मा चौथा खेळाडू आहे. याआधी गेल, डिव्हिलियर्स आणि धोनी यांनी त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे.