भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर सलामीला येण्याबाबत वक्तव्य केले आहे. २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात त्यांनी डावाची सुरुवात केली होती. यावेळी सलामीला फलंदाजी करताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी रचली. यामुळे भारताने इंग्लंडपुढे २२५ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारले आणि ३६ धावांनी सामना खिशात घातला.
ही पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर रोहित म्हणाला की, “टी -२० विश्वचषकाला अजून बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे आमची फलंदाजी फळी कशी असेल याबद्दल बोलणे फार घाईचे ठरेल. आम्हाला निवांत बसून संघासाठी सर्वात अनुकूल पर्याय काय असतील हे ठरवावे लागेल. पाचव्या टी -२० सामन्यात विराटने डावाची सुरुवात करणे ही एकप्रकारची रणनीति होती. कारण आम्हाला अतिरिक्त गोलंदाजांना संघात खेळवायचे आणि फलंदाजाला बाहेर ठेवायचे होते. यामुळे दुर्दैवाने लोकेश राहुलला बाहेर बसावे लागले जो एक कठीण निर्णय होता.”
तसेच रोहित पुढे म्हणाला, “मर्यादित षटकांत खासकरुन टी-20 मध्ये राहुल आमचा प्रमुख खेळाडू आहे. सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने सर्वोत्तम अकरा खेळाडूसह खेळण्याचा करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ असा नाही की, भविष्यात राहुलच्या नावाचा विचार केला जाणार नाही. तो निर्णय फक्त एका सामन्यासाठी होता. जेव्हा वर्ल्डकप जवळ असेल तेव्हा गोष्टी बदलू शकतात.”
रोहितपुर्वी कर्णधार कोहलीही म्हणाला होता की, रोहित आणि राहुल ही भारतीय संघाची पहिली आवडती सलामी जोडी आहे. त्यामुळे टी२० वर्ल्डकप २०२१ मध्ये रोहित-विराटच्या जागी संघाची ठरलेली रोहित-राहुलची सलामी जोडी दिसू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेरी पाहुणचार! वनडेसाठी पुण्यात आलेली टीम इंडिया ‘या’ अलिशान हॉटेलमध्ये करतेय विश्रांती
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर ‘या’ खेळाडूंचे IPLमध्ये शानदार प्रदर्शन; एक तर ठरला ‘मॅच विनर’
‘त्याच्या’मुळेच विराटला टी२०त करता आली ओपनिंग; झहीर खानची युवा खेळाडूवर कौतुकाची थाप