---Advertisement---

भारतीय संघासाठी खुशखबर! रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्यास सज्ज

On: शुक्रवार, डिसेंबर 11, 2020 3:13 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघासाठी खुशखबर आली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा वनडे आणि टी-२० मालिकेला मुकला होता. मात्र आज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट पास झाल्याने रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयपीएलनंतर दुखापतीतून सावरण्यासाठी रोहित बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कसून मेहनत करत होता. या मेहनतीचे फळ म्हणून पुनर्वसन कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करत रोहित आता ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघात सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.

१३ डिसेंबरला होऊ शकतो रवाना
बीसीसीआयने रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही आहे. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. रोहित १३ डिसेंबरला चार्टर्ड विमानाने आधी दुबईला आणि मग तिथून पुढे सिडनीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.

विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे लागणार
रोहित शर्मा येत्या दोन ते तीन दिवसांत ऑस्ट्रेलियात दाखल होणार असला तरी जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमांनुसार त्याला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने विलगीकरणाची सक्त नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे रोहित १४ तारखेला ऑस्ट्रेलियात पोहोचला तरी १४ दिवसानंतर म्हणजेच २८ तारखेला तो संघात सामील होऊ शकेल. त्यामुळे रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यात तो संघनिवडीसाठी उपलब्ध असेल.

रोहितच्या फिटनेसबाबत होता संभ्रम
भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांचा नियमित उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माला आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतांना मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे दुखापत झाली होती. त्यानंतर काही सामने त्याने विश्रांति देखील घेतली होती. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना रोहितला वगळण्यात आले. परंतु आयपीएलच्या क्वॉलिफायर आणि अंतिम सामन्यात त्याने भाग घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याच्या संघातील समावेशावरून टीका होऊ लागताच कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण बेजबाबदार पद्धतीने हाताळल्या बद्दल माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले होते. कर्णधार विराट कोहलीने देखील रोहितच्या तंदुरुस्तीबाबत योग्य ती माहिती दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता रोहित फिटनेस टेस्ट पास होऊन ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्यासाठी सज्ज झाल्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

संबंधित बातम्या:
– आतुरता! रोहितला ऑस्ट्रेलियाला रवाना करण्याबाबत बीसीसीआय आज घेणार निर्णय?
– रोहितच्या निवडीबाबत सचिनचे मोठे वक्तव्य; म्हणाला
– “त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही”, रोहितच्या अनुपस्थितीबाबत विराटचे मोठे विधान

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---