भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र काही दिवसानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला. जर तो दुखापतग्रस्त असेल, तर आयपीएलमध्ये कसा खेळतोय? हा प्रश्न चाहत्यांना पडला. आता या विषयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केले आहे.
रोहितबाबत माहिती देण्यात आली नव्हती- विराट कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी (27 नोव्हेंबर ) होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याआधी वर्चुअल पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला की, निवड समितीच्या बैठकीपूर्वी रोहित शर्माला सांगण्यात आले होते की त्याला मोठी दुखापत होऊ शकते आणि म्हणूनच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. पण यानंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळताना दिसला, अशा परिस्थितीत मला वाटले की आता तो आमच्याबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल. पण तसे झाले नाही. आम्हाला रोहित शर्माबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.”
रोहितबाबत ई-मेलद्वारे कळवण्यात आले होते
पुढे बोलताना विराट म्हणाला की, “निवड समितीच्या बैठकीपूर्वी आम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात आले होते की, रोहित आगामी मालिकेसाठी उपलब्ध नाही. आयपीएलदरम्यान त्याला दुखापत झाली आहे आणि दुखापतीसंदर्भात त्याला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियादौऱ्यावर अनुपलब्ध असेल.”
रोहित सध्या राष्टीय क्रिकेट अकॅडेमीमध्ये
पायाच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे रोहित बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीमध्ये तंदुरुस्तीवर काम करत आहे. पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्याची तंदुरुस्ती चाचणी 11 डिसेंबरला होईल. त्यानंतर त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील सहभागावर निर्णय घेतला जाईल.