शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. परंतु मुंबईचे फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. ज्यामुळे त्याच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. परंतु रोहित शर्मा १० चेंडूंमध्ये अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. त्याला आवेश खानने कागिसो रबाडाच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस एकेरी धाव करत बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान गाठले आहे.
रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठमोठे विक्रम केले आहेत. तसेच नको असलेल्या विक्रमाच्या यादीत देखील तो अव्वलस्थानी आला आहे. तो ६० वेळेस एकेरी धाव करत माघारी परतला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी दिनेश कार्तिक आहे, जो ५८ वेळेस एकेरी धाव करत माघारी परतला आहे. तर सुरेश रैना ५२, रॉबिन उथप्पा ५१, शिखर धवन ४६ आणि एबी डिविलियर्स ४५ वेळेस एकेरी धाव करत माघारी परतले आहेत.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस एकेरी धावसंख्येवर बाद झालेले फलंदाज
६० वेळेस – रोहित शर्मा*
५८ वेळेस – दिनेश कार्तिक
५२ वेळेस – सुरेश रैना
५१ वेळेस – रॉबिन उथप्पा
४६ वेळेस – शिखर धवन
४५ वेळेस – एबी डीविलियर्स
महत्त्वाच्या बातम्या-
पूजा-झुलनच्या भेदकतेपुढे ऑस्ट्रेलियाच्या बत्त्या गुल, तिसऱ्या दिवसाखेर यजमानांच्या ४ बाद १४३ धावा
जेव्हा अश्विनला तसा जल्लोष केल्याने खावे लागले होते धोनीचे बोलणे, सेहवागने सांगितला जुना किस्सा