भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-० अशा मोठ्या फरकाने जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ विकेट्स शिल्लक ठेऊन सोपा विजय मिळवला आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप (३-०) दिला. असे असले तरी, कर्णधार रोहित शर्मा मात्र या टी-२० मालिकेत अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही.
रोहितने मालिकेतील पहिल्या सामन्यात ३२ चेंडूत ४४ धावा केल्या, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो १० धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने फक्त १, तर तिसऱ्या सामन्यात ५ धावा करून स्वतःची विकेट स्वस्तात गमावली. विशेष म्हणजे तो या तिन्ही सामन्यात त्रिफळाचीत झाला. या खराब प्रदर्शनानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो तब्बल ४० वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा अशी खराब कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर आयर्लंडचा केविन ओब्रायन आहे, जो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये आतापर्यंत तब्बल ४२ वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा मुशफिकूर रहीम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रहीम ३८ वेळी एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. पाकिस्तानचा शाहीद अफ्रिदी चौथा असा खेळाडू आहे, जो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे, त्याने ही नकोशी कामगिरी ३७ वेळा केली.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सलामीवीर फलंदाजांचा विचार केला, तर रोहित शर्मा सर्वात जास्त वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. यापूर्वी रोहित आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग बरोबरीवर होते. आता रोहितने पॉलला मागे टाकत सलामीवीराच्या रूपात ही नकोशी कामगिरी तब्बल २९ वेळा केली आहे. या दोघांव्यतिरिक्त या यादीत इतरही दिग्गज सलामीवीरांचा समावेश आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद होणारे सलामीवीर
१. रोहित शर्मा – २९ वेळा
२. पॉल स्टार्लिंग – २८ वेळा
३. ऍरॉन फिंच – २७ वेळा
४. मार्टिन गप्टिल – २७ वेळा
५. तिलकरत्ने दिलशान – २६ वेळा
६. डेविड वॉर्नर – २६ वेळा
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने जिंकल्यानंतर भारताला आता दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघातील टी-२० मालिकेचा पहिला सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे, तर दुसरा सामना ११ मार्चपासून खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
भविष्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे मोठे पाऊल, युवा खेळाडूंसाठी करणार ‘ही’ महत्त्वाची गोष्ट





