---Advertisement---

आयपीएल २०२०: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यंदा करू शकतो हे ४ मोठे विक्रम

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 2:16 PM
---Advertisement---

भारतीय दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच विक्रम नोंदविली आहेत. तसेच आयपीएलमध्येही तो जबरदस्त फलंदाजी करत आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून यात त्याची फलंदाजी चांगली झाली आहे.

रोहित शर्मा या हंगामात देखील मुंबई इंडियन्सकडून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न घेऊन नक्की मैदानात उतरेल. परंतु त्याला यासाठी स्वत: चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. आयपीएलच्या मोसमात आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ शानदार प्रदर्शन करत आला आहे आणि यावेळी त्यांना तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

या हंगामात रोहित शर्माने आपला खेळ दाखवला तर त्याच्या नावावर काही मोठे विक्रम नोंदविले जाऊ शकतात. जाणून घेऊया रोहित शर्मा या आयपीएल हंगामात कोणते विक्रम नोंदवू शकेल.

या हंगामांत हे ४ मोठे विक्रम रोहित शर्माच्या नावावर होऊ शकतात

४. आयपीएलमध्ये ५००० धावा –

रोहित शर्माने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८८ सामने खेळताना ३१.६० च्या सरासरीने १ शतक आणि ३६ अर्धशतकांसह ४८९८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी १०२ धावांची गरज आहे. जर त्याने हा टप्पा यंदा पार केला, तर तो आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तिसराच फलंदाज ठरेल. त्याच्याआधी विराट कोहली (५४१२) आणि सुरेश रैना (५३६८) यांनी हा पराक्रम केला आहे.

३. सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम

‘सामनावीर’ हा सन्मान एखाद्या सामन्यात जो खेळाडू उत्कृष्ठ योगदान देतो त्या खेळाडूला देण्यात येतो. सामनावीर हा सन्मान कोणत्याही खेळाडूसाठी खूप खास असतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १२५ सामन्यात २१ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

एबी डिव्हिलियर्स २० सामनावीर पुरस्कारासह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर एमएस धोनी, डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा १७ पुरस्कारांसह संयुक्तरित्या तिसर्‍या क्रमांकावर आहेत. जर आयपीएलच्या संपूर्ण सत्रात रोहित शर्माची कामगिरी जबरदस्त राहिली तर तो ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो.

२. आयपीएलमध्ये ४ हजार धावा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिला खेळाडू

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना १४३ सामन्यांमध्ये ३७२८ धावा केल्या असून यात त्याने २८ अर्धशतके झळकावली आहेत.

आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून ४ हजार धावा करू शकतो. हा टप्पा त्याने पार केला तर आयपीएलमध्ये खेळताना मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ४ हजार धावा काढणारा तो पहिला खेळाडू ठरेल.

१. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू

कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा मोठे फटाके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तो पुल शॉटवर षटकार मारतो तेव्हा तो पाहण्यासारखा असतो. त्याने भारतीय संघासाठी अनेक मोठं-मोठे षटकार ठोकले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक २०९ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या नावावर १९४ षटकार आहेत. रोहित शर्मा या हंगामात एमएस धोनीचा हा विक्रम मोडू शकतो.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---