टीम इंडिया आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानं टी20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 8 जून रोजी रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी आहे. जर भारतानं आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर रोहित शर्मा महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनेल.
37 वर्षीय रोहित शर्माकडे टी20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची संधी आहे. रोहितनं भारताचा कर्णधार म्हणून आतापर्यंत खेळलेल्या 54 टी20 सामन्यांपैकी 41 सामने जिंकले आहेत. टी20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो महेंद्रसिंह धोनीच्या बरोबरीत आहे. जर आजच्या सामन्यात आयर्लंडला पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आलं तर हा रोहितचा कर्णधार म्हणून 42 वा विजय असेल. यासह तो धोनीला सर्वाधिक विजयांच्या बाबतीत मागे टाकेल.
भारतीय संघ टी20 विश्वचषक 2021 च्या गट टप्प्यातूनच बाहेर पडला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये रोहितची भारताचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्याच्या टी20 विश्वचषकापूर्वी त्यानं 2022 टी20 विश्वचषकातही टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. या विश्वचषकात संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाला होता. यावर्षी भारताच्या खात्यात दुसरी टी20 विश्वचषक ट्रॉफी जमा करण्याचं रोहितचं लक्ष्य असेल. भारत शेवटचा टी20 विश्वचषक 17 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जिंकला होता.
कर्णधार म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. 29 वर्षीय बाबरनं पाकिस्तान संघाचं नेतृत्व करताना 81 पैकी 46 सामन्यांमध्ये विजयांची नोंद केली आहे. बाबरनंतर युगांडाचा ब्रायन मसाबा याचा क्रमांक लागतो. त्यानं 44 टी20 सामने जिंकले आहेत. त्याच्यानंतर इंग्लंडचा इऑन मॉर्गन (42 विजय) आणि अफगाणिस्तानचा असगर अफगाण (42 विजय) हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शिवम दुबेची तुलना चक्क कपिल देव यांच्याशी! सीएसकेच्या कोचचं धक्कादायक वक्तव्य
रविचंद्रन अश्विन सीएसकेमध्ये परतला, फ्रँचायझीनं आयपीएल 2025 पूर्वी दिली महत्त्वाची जबाबदारी
युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम