क्रिकेटटॉप बातम्या

आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतीयांची हवा! कर्णधार रोहितला मिळाले मोठे यश, विराट ‘या’ स्थानी

बुधवारी (19 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. कसोटी फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन, तर गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन आपल्या पहिल्या स्थानावर कायम आहेत. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. तसेच फिरकीपटू रविंद्र जडेजा यालाही ताज्या क्रमवारीत मोठा फायदा झाल्याचे दिसते.

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शतक केले होते. मात्र, कसोटी पदार्पणाच्या सामन्यात जशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने केलेले शतक अधिक चर्चेचा विषय ठरले. रोहितने या सामन्यात 103, तर जयसवालने 171 धावा कुटल्या होत्या. रोहितच्या या शतकासाठी माध्यमांमध्ये जास्त स्थान मिळाले नाही. मात्र, आयसीसीने त्याच्या प्रदर्शनाची दखल घेतली. ताज्या आयसीसी कसोटी क्रमावारीत (ICC Rankings) रोहित पुन्हा एकदा पहिल्या 10 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे.

कसोटी फलंदाजांच्या यादीत 10व्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर रोहितकडे आता 751 गुण आहेत. कालपर्यंत रोहितच्या जागी 10वा क्रमांक भारताचाच रिषभ पंत (RIshabh Pant) याचा होता. पण वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधाराने केलेल्या महत्वपूर्ण शतकामुळे पंत 11व्या स्थानी घसरला आहे. तसेच भारतीय दिग्गज विराट कोहली 711 गुणांसह 14व्या स्थानी आहे. विराटनेही वेस्ट इंडीजविरुद्ध 76 धावा कुटल्या होत्या. डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंतचा कार अपघात झाला होता आणि अजूनही तो संघातून बाहेरच आहे. रोहित आणि जयसवालच्या या शतकामुळे भारताने एक डाव 141 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (20 जुलै) सुरू होणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. पण तरीदेखील विलियम्सनने कसोटी फलंदाजांच्या यादीत आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. विलियम्सनकडे 883 गुण असून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय संघाचा दिग्गज रविचंद्रन अश्विन सध्याच्या युगातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मागच्या काही महिन्यांपासून त्याने ही गोष्ट कसोटी क्रमवारीतून सिद्ध केली आहे. अश्विन यावेळीही कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्याकडे एकूण 884 गुण आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने एकूण 12 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनला या सामन्यात चांगली साथ मिळाली होती रविंद्र जडेजा याची.

जडेजाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एकूण पाच विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रमवारीत त्याला या प्रदर्शनाचा फायदा झाला, असे आपण म्हणू शकतो. जडेजा गोलंदाजांच्या यादीत तिन स्थानांची मजल मारत थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीत देखील जडेजाने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. अष्टपैलूंमध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज मिचेल स्टार्क 9व्या क्रमाकावरून आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Rohit Sharma has joined the top 10 Test batsmen in the latest ICC rankings)

महत्वाच्या बातम्या –
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला कुस्तीपटू बजरंग पुनिया, स्वखर्चातून ‘अशी’ केली मदत
विंडीजच्या घसरणाऱ्या स्तराविषयी भारतीय कर्णधाराला सवाल, रोहित काय म्हणाला लगेच वाचा

Related Articles