कोलकाता। रविवारी (२१ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विश्वविक्रम केला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने आपली चांगली लय कायम ठेवताना अर्धशतकी खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३० वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला आहे. रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत ४ शतकं आणि २६ अर्धशतकं केली आहेत.
हा विक्रम करताना रोहितने भारताच्याच विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २९ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत रोहित आणि विराटच्या पाठोपाठ बाबर आझम आणि डेव्हिड वॉर्नर आहेत. बाबरने २५ वेळा, तर वॉर्नरने २२ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
ज्याप्रमाणे रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, त्याप्रमाणे वनडे आणि कसोटीमध्ये असा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर-ब्लास्टर सचिनने कसोटीत ११९ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे, तर वनडेमध्ये १४५ वेळा सचिनने ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
ईडन गार्डन्स रोहितसाठी स्पेशल
ईडन गार्डन्स रोहितसाठी अनेक अर्थाने खास राहिले आहे. त्याने २०१३ साली आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना याच मैदानात खेळला होता. तसेच त्याने कर्णधार म्हणून २०१३ आणि २०१५ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचे विजेतेपद देखील याच मैदानावर मिळवले.
इतकेच नाही तर त्याने एकमेव आयपीएल शतक देखील याच मैदानावर केले असून, कसोटी पदार्पणही याच मैदानावर करताना शतकी खेळी केली होती. तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च २६४ धावांची खेळी देखील रोहितने याच मैदानावर केली.
महत्त्वाच्या बातम्या –
माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान
जवळपास ठरलंच! स्मिथ नाहीतर ‘हा’ असणार ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार
शाहीनला भोवला अतातायिपणा; ‘या’ प्रकरणात आयसीसीने केली कारवाई