भारत विरुद्ध इंग्लंड संघात १२ मार्चपासून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड झाली आहे. यात सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचाही समावेश आहे. भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाल्यानंतर त्यांना भारताच्या मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माकडून खास सल्ला मिळाला आहे.
टी२० मालिकेच्या आधी रोहित शर्मा बुधवारी (१० मार्च) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला सुर्यकुमार आणि इशान किशनबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, ‘मला वाटत नाही की त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार करावा. मी त्यांना गेल्या काही वर्षापासून जवळून पाहिले आहे. त्यावरुन मला वाटते की त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की त्यांनी संघात यावे आणि संघाचा भाग व्हावे, ज्या संघाने इतके वर्षे यशाची चव घेतली आहे. मला वाटते की त्यांनी आनंद घ्यावा आणि या संघाला पूर्णपणे समजून घ्यावे.’
याबरोबरच संघात नवीन येणाऱ्या खेळाडूंप्रती वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकेबद्दलही रोहितने आपली मते मांडली. तो म्हणाला, ‘ते पहिल्यांदाच संघात निवडले गेल्याचे लक्षात घेता ते नर्व्हस असतील, ते त्यांच्या कामगिरीबद्दल विचार करत असतील. त्यामुळे मी आणि संघातील वरिष्ठ सदस्य, कोचिंग स्टाफ असे आम्ही त्यांना हे सांगणे महत्त्वाचे आहे की हा फक्त एक वेगळा संघ आहे, ज्यात तुम्ही सामील झाला आहात. तुम्ही आत्ताच्या क्षणांचा आनंद घ्या.’
पुढे रोहित म्हणाला, ‘कामगिरीबद्दल आणि संधी मिळण्यासाठी मला काय करावे लागले, असा विचार करत राहिल्यास त्यांच्यावर फक्त दबाव येत राहिल. त्यामुळे मला वाटते की त्यांनी या सुंदर संघाचा भाग होत आनंद घ्यावा आणि रिलॅक्स रहावं. मला खात्री आहे, संधी मिळाल्यावर ते चांगली कामगिरी करतात, विशेषत: मागीलवर्षी त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ती लय इथे कायम ठेवणे गरजेचे असेल.’
याबरोबरच रोहित म्हणाला, ‘त्यांच्यासाठी हे सोपे नसेल. त्यांच्यासमोर आव्हाने असतील आणि हेच तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. तुम्हाला प्रत्येकवेळी आव्हान असते आणि त्या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे जाता, हे महत्त्वाचे असते. त्यांना योग्य मानसिकतेबद्दल आणि येणाऱ्या आव्हानांबद्दल कल्पना देणे महत्त्वाचे आहे.’
🗣️🗣️ "I just want Surya & Ishan to have fun."#TeamIndia vice-captain @ImRo45 has a piece of advice for new entrants @surya_14kumar and @ishankishan51 👌@Paytm #INDvENG pic.twitter.com/5w8bTK2AfA
— BCCI (@BCCI) March 10, 2021
इशान आणि सुर्यकुमार हे रोहितच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षापासून इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळत आहेत. त्यांनी मागीलवर्षी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. सूर्यकुमारने १३ व्या आयपीएल हंगामात १६ सामने खेळताना १४५.०१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४८० धावा केल्या. तसेच इशान किशनने १४ सामन्यात ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तयारी झाली! १२ तारखेची आणखी वाट पाहू शकत नाही’, भारतीय खेळाडूने फुकले टी२० मालिकेचे रणशिंग
टी२० मालिका: अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम करणारा ‘तो’ गोलंदाज घेणार बुमराहची जागा?