तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली इंग्लंड आणि वेल्समध्ये वनडे विश्वचषक पार पडला होता. या विश्वचषकात भारतीय संघाला जरी उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला असला तरी हा विश्वचषक भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने गाजवला होता. त्याने या विश्वचषकादरम्यान सर्वाधिक धावा करण्याबरोबरच अनेक मोठे विक्रम केले. त्यातीलच एक विक्रम म्हणजे एकाच विश्वचषक स्पर्धेदरम्यान सर्वाधिक ५ शतकं करण्याचा. या विक्रमाची नोंद त्याने ६ जुलै २०१९ रोजी श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आपल्या नावावर केली होती. या विक्रमाला आज बरोबर ३ वर्षे पूर्ण होत आहेत.
मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेचं भारताला २६५ धावांचं आव्हान
हेडिंग्ले, लीड्स येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात साखळी फेरीतील सामना पार पडला होता. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांची सुरुवात खास झाली नाही. श्रीलंकेने ५५ धावांतच ४ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, अँजेलो मॅथ्यूज आणि लहिरु थिरिमन्नेने संघाचा डाव सावरताना १२४ धावांची शतकी भागीदारी रचली.
थिरिमन्ने ५३ धावा करुन बाद झाला. पण, त्यानंतरही मॅथ्यूजने आपली लय कामय राखताना धनंजय डी सिल्वाला साथीला घेत श्रीलंकेला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यांनी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, डावाच्या ४९ व्या षटकात मॅथ्यूज १२८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार मारुन ११३ धावांवर बाद झाला. पण त्याच्या या शतकी खेळीमुळे श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २६४ धावा करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
रोहितचे विश्वचषकातील ५ वे विक्रमी शतक
श्रीलंकेने दिलेल्या २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा ही सलामीवीरांची जोडी मैदानात उतरली. या दोघांनीही सुरुवातीपासूनच चांगला खेळ करताना खेळपट्टीवर तळ ठोकत चक्क १८९ धावांची सलामी भागीदारी केली. ही भागीदारी रोहित ३१ व्या षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तुटली. पण, रोहित बाद झाला तेव्हा त्याने २०१९ विश्वचषकातील विश्वविक्रमी ५ वे शतक झळकावले होते. त्याने ९४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह १०३ धावा केल्या होत्या.
त्याच्यापाठोपाठ काहीवेळाने केएल राहुल १११ धावांवर बाद झाला. पण तोपर्यंत विजय भारताच्या टप्प्यात आला होता. भारताने पुढे ४४ व्या षटकात २६५ धावा करत हा सामना ७ विकेट्सने जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
122* vs 🇿🇦
140 vs 🇵🇰
102 vs 🏴
104 vs 🇧🇩
103 vs 🇱🇰On this day in 2019, @BCCI star Rohit Sharma broke the record for the most centuries in a @CricketWorldCup tournament. pic.twitter.com/z4xLYmhNNw
— ICC (@ICC) July 6, 2021
संगकाराचा विक्रम पडला मागे
रोहितने या सामन्यात शतक करत एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. यापूर्वी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ विश्वचषकात ४ शतकं झळकावली होती.
रोहितने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशविरुद्ध १०४ धावा, इंग्लंडविरुद्ध १०२ धावा, पाकिस्तानविरुद्ध १४० धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२२ धावा करत शतकं झळकावली होती. तसेच या संपूर्ण विश्वचषकात त्याने ९ सामन्यांत ८१ च्या सरासरीने ५ शतकांसह सर्वाधिक ६४८ धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
महिला हॉकी विश्वचषक: वंदना कटारियाच्या गोलने भारत ‘सेफ झोन’मध्ये
ऍजबस्टन कसोटीत इंग्लंडने वापरलेली ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? कोच मॅक्यूलमशी कनेक्शन
कोच द्रविडने सांगितले का भारताने गमावली ऍजबस्टन कसोटी? पुढील योजनेबद्दलही लक्षवेधी प्रतिक्रिया