इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची खेळी अत्यंत निराशाजनक राहिली. शार्दुल ठाकूर आणि कर्णधार कोहली यांचे अर्धशतक वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. एवढेच नाहीतर सलामीचा फलंदाज रोहित शर्माने एक शानदार शतक देखील ठोकले. यासह भारताबाहेर रोहितचे हे पहिलेच शतक ठरले.
रोहितने ९४ धावांवर असताना मोईन अलीच्या चेंडूवर षटकार मारत शतक पूर्ण केले. यासह रोहितने अनेक मोठ्या विक्रामांना गवसणी घातली. रोहित हा क्रिकेटच्या तीनही स्वरूपात इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पहिलाच विदेशी सलामीवीर फलंदाज ठरला आहे. तसेच इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या तीनही स्वरूपात शतक ठोकणाऱ्यांमध्ये केएल राहुलनंतर देखील तो दुसरा फलंदाज ठरला.
रोहितने २०१८ साली आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ब्रिस्ट्रोल येथे १०० धावांची खेळी केली होती. तसेच वनडेत त्याने इंग्लंडमध्ये ७ शतकं केली आहेत. याशिवाय आता त्याने इंग्लंडमध्ये कसोटीतही शतकी खेळी केली.
एवढेच नाही तर, रोहित हा इंग्लंडमध्ये कोणत्याही विदेशी खेळाडूद्वारा सर्वाधिक वेळा शतक करणाऱ्यांमध्ये सर डॉन ब्रॅडमन आणि सर विव रिचर्डसन यांच्या यादीत रोहितने आपला समावेश केला आहे. ब्रॅडमन यांनी ११ शतक लगावले होते. तर रोहितने या विक्रमात रिचर्डसन यांची बरोबरी केली आहे. या दोघांनीही इंग्लंडमध्ये प्रत्येकी ९ शतकं ठोकले आहेत.
तसेच रोहितने चालू २०२१ वर्षात १००० धावांचा टप्पा देखील या खेळीदरम्यान पार केला आहे. यासह तो २०२१ मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला.
या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघ ९९ धावांनी पिछाडीवर पडला होता. यानंतर दुसऱ्या डावात रोहितने केएल राहुलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर राहुल अँडरसनच्या गोलंदाजीवर ४६ धावांवर बाद झाला. पण नंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दीडशतकी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले.
मात्र रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघांची ही खेळी ८१ व्या षटकांत संपुष्टात आली. रोहित १२७ धावांवर आणि पुजारा ६१ धावांवर ऑली रॉबिन्सनविरुद्ध खेळताना बाद झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘मिस्टर आयपीएल’च्या खणखणीत षटकाराने लुटली मैफील, मागे थांबलेला धोनी बघतच राहिला
–जेव्हा शास्त्रींवर चिडून इम्रान संघ सहकाऱ्यांना म्हणाले होते, ‘बाऊन्सर्सचा मारा करुन याचं डोकं फोडा’
–टी२० विश्वचषकामध्ये ‘या’ संघांच्या विजयाचं पारडं असेल जड, मातब्बर फिनिशर्सची आहे भरमार