बुधवारी (३ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत भारत आणि अफगानिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. या स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. या खेळी दरम्यान त्याने एक अप्रतिम षटकार मारला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रोहित शर्मा कडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो भोपळाही न फोडता माघारी परतला होता. तर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या १४ धावा करण्यात यश आले होते. या फ्लॉप कामगिरीनंतर अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. त्याने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले.
यादरम्यान ५ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर रोहित शर्माने असा काही षटकार मारला, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने लाँग ऑनच्या दिशेने हा षटकार मारला होता, ज्याचा चेंडू भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये गेला होता. त्यावेळी डगआऊटमध्ये असलेल्या विराट कोहलीने त्याचा झेल टिपला आणि चेंडू अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दिला होता.
https://www.instagram.com/reel/CV0UGTFFou-/?utm_medium=copy_link
या सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक ७४ तर केएल राहुलने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर २ बाद २१० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाकडून करीम जनतने नाबाद ४२ तर मोहम्मद नबीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
“दोन सामने हरलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही खेळाडू वाईट आहोत किंवा आमचा लीडर वाईट आहे”
एका विजयाने बदलली समीकरणे, जाणून घ्या टीम इंडिया कसे मिळवू शकते सेमीफायनलचे तिकीट?