Rohit Sharma Injury :- भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे होणार आहे. आतापर्यंत पाहुण्या भारतीय संघाला या मालिकेत विशेष खेळ करता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला या मालिकेत चांगली खेळी करता आलेली नाही. आता तिसऱ्या व शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आता पुढील सामन्यातील रोहितच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह आहे. त्याचे मुख्य कारणही समोर आले आहे.
रोहित सराव सत्रात सहभागी झाला नाही
भारतीय संघाने आज तिसऱ्या वनडेपूर्वी सराव केला. या सराव सत्रात कर्णधार रोहित दिसला नाही. खरंतर, दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितला थोडी समस्या जाणवत होती. या सामन्यात रोहितला उजव्या मांडीत वेदना होत होत्या. त्यामुळे सामन्यादरम्यान फिजिओनेही रोहितची अनेकदा काळजी घेतली होती. अशा स्थितीत सराव सत्रात रोहितची अनुपस्थिती संघाची चिंता वाढवत आहे. रोहित हा भारतीय संघाचा मजबूत दुवा आहे आणि तिसऱ्या व निर्णायक सामन्यात त्याचं खेळणं खूप महत्त्वाचं आहे. आता भारतीय कर्णधार दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतून बाहेर जाण्याचा धोका आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून चांगली फलंदाजी करणारा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. रोहित या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. भारतीय कर्णधाराने आतापर्यंत दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात 57 धावांची तर दुसऱ्या सामन्यात 64 धावांची खेळी केली होती.
भारतीय संघाला मालिका बरोबरीत सोडवायची आहे
वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर श्रीलंका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ तिसरा सामना जिंकून ही मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताच्या वनडे संघातून ‘या’ 3 खेळाडूंची होऊ शकते कायमची सुट्टी!
पृथ्वी शॉ वेधतोय प्रशिक्षक गंभीरचं लक्ष! वनडे कप स्पर्धेत 44 चौकारांच्या मदतीने केल्यात 294 धावा
IND vs SL: 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघ अडचणीत