इंडियन प्रीमियर लीग २०२०चा अंतिम सामना मंगळवारी (१० नोव्हेंबर) झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सनी नमवले. यासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली. मुंबईच्या या विजयात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. दरम्यान बोल्टने ४ षटकात ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. यात मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे आणि शिमरॉन हेटमायर यांच्या विकेटचा समावेश होता.
काय म्हणाला रोहित ?
बोल्टच्या या योगदानानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने त्याची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “आम्हाला अशा एका गोलंदाजाचा शोध होता, जो पावरप्लेमध्ये अधिकाधिक विकेट्स घेईल. त्यानंतर आम्ही क्रिकेटजगतातील मोठ-मोठ्या गोलंदाजांचा विचार केला. त्या सर्वांमध्ये आम्हाला ट्रेंट बोल्ट सर्वोत्कृष्ट वाटला. त्याच्याकडे नव्या चेंडूला स्विंग करण्याची क्षमता आहे. यामुळे फलंदाजांना त्याचा सामना करणे कठीण जाते.”
तसेच पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “दिल्ली कॅपिटल्सने बोल्टला रिलीज करुन मोठी चुकी केली. आम्हाला फार पुर्वीपासून बोल्टला संघात सामील करायचे आणि यंदा आम्ही भाग्यशाली ठरलो. त्यानेही आम्हाला निराश केले नाही. पावरप्लेमध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली. आशा करतो की तो पुढील काही वर्षे मुंबईचा भाग राहिल.”
एकवेळ होता दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य
महत्त्वाचे म्हणजे, बोल्ट गेल्या २ वर्षांपासून दिल्ली संघाचा भाग होता. मात्र आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्लीने त्याला ट्रेड करत मुंबईकडे सोपवले. परंतु, दिल्लीने त्यावेळी घेतलेला हा निर्णय आता त्यांच्यासाठीच घातक ठरला असल्याचे दिसत आहे. कारण याच बोल्टने दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर १ सामन्यात कमालीची गोलंदाजी केले. त्याने २ षटकात केवळ ९ धावा देत २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले होते. तर अंतिम सामन्यातही त्याने दिल्लीच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
ट्रेंट बोल्टची कामगिरी
बोल्टची आयपीएलमधील गेल्या २ वर्षांतील आकडेवारीपेक्षा यंदाची आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने २०१८-१९मध्ये दिल्लीकडून १९ सामने खेळले असून २३ विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षी त्याने १५ सामन्यात एकूण २५ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतीनंतर आता धोनी कुक्कुटपालन व्यवसायात; ‘या’ खास कोंबड्यांचा करणार व्यापार
कर्णधाराच्या निर्णयामुळे वैतागला स्टार्क, चक्क बॅटच दिली फेकून, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज