---Advertisement---

रोहित-राहुलची कमाल! शतकी भागीदारी करताना तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी, एका विश्वविक्रमाचाही समावेश

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 11:58 AM
KL Rahul and Rohit Sharma
---Advertisement---

रांची। शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) भारताने न्यूझीलंडविरुद्ध जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टी२० मालिकेच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांची जोडीचा मोठा वाटा राहिला. या दोघांनी शतकी भागीदारी करत अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.

सलग ५ वी शतकी भागीदारी
या सामन्यात न्यूझीलंडने १५४ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि राहुल या दोघांनी ११७ धावांची शतकी भागादारी रचली. रोहित आणि राहुल यांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही सगल ५ वी वेळ आहे. त्यांनी यापूर्वी गेल्या ४ सामन्यांमध्ये १४०, ७०, ८६ आणि ५० अशा भागीदारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे.

भागीदारीत १००० धावा
याशिवाय या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना भागीदारीमध्ये १००० धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलामी भागीदारीत १००० पेक्षा अधिक धावा करणारी रोहित आणि राहुल यांची दुसरीच भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी असा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केला आहे. रोहित आणि शिखर यांनी सलामीला १७४३ धावा भागीदारीत केल्या आहेत, तर रोहित आणि राहुल यांनी सलामी भागीदारीत आता १०५० धावा केल्या आहेत.

सर्वाधिक शतकी भागीदारी 
इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिकवेळ शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीतही रोहित आणि राहुल अव्वल क्रमांकावर आले आहेत. रोहित आणि राहुल यांची आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतकी भागीदारी करण्याची ५ वी वेळ होती. त्यामुळे त्यांनी हा विश्वविक्रम करताना पाकिस्तानची बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीची बरोबरी केली आहे. बाबर आणि रिझवान यांनीही आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

रोहित-राहुलची अर्धशतके
शुक्रवारी झालेल्या सामन्यांत रोहित आणि राहुल या दोघांनी शतकी भागीदारीबरोबरच वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. रोहितने ५५ धावांची खेळी केली, तर केएल राहुलने ६५ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने १५४ धावांचे आव्हान १७.२ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तसेच मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी ३१ धावा केल्या. भारताकडून हर्षल पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितचा ‘हिट’ विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू

‘चुका करतो आणि शिकतो’, पदार्पणाच्या सामन्यातच ‘सामनावीर’ ठरलेल्या हर्षल पटेलची प्रतिक्रिया

जिद्दीला मेहनतीची साथ! एकेकाळी मैदानावर कापत होता गवत, आता आहे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फिरकी अस्त्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---