भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. या मालिकेतील दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली गेली. भारतानं या कसोटीत मोठ्या फरकानं विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहित शर्माच्या खास रणनीतीचा मोठा वाटा होता, असा खुलासा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं केला आहे.
कानपूर कसोटीत पावसामुळे मैदान जवळपास तीन दिवस ओलं राहिलं होतं. यामुळे निकाल निघणं कठीण वाटत होतं. मात्र गेल्या दोन दिवसांत भारतीय संघानं बांगलादेशला दोन वेळा ऑलआउट केलं आणि फलंदाजांनी आक्रमक खेळ करत सामना आपल्या बाजूनं वळवला.
रविचंद्रन अश्विननं सामन्यानंतर बोलताना सांगितलं की, रोहित शर्मानं ड्रेसिंग रूममधील खेळाडूंना निर्भयपणे खेळण्याची सूचना केली होती. तो म्हणाला, “रोहितनं आम्हाला सांगितलं की, आम्हाला कोणत्याही दबावाशिवाय खेळायचं आहे. त्यानं स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही 230 धावांवर बाद झालो, तरी आपल्याला बांगलादेशला 80 षटकांत पुन्हा ऑलआऊट करायचं आहे. पहिल्या डावातील त्याचा आत्मविश्वास आणि आक्रमकत संघाच्या फलंदाजीतही दिसून आला. त्यादरम्यान आम्ही पाच विश्वविक्रम मोडले.”
सामन्यादरम्यान खेळपट्टी आणि गोलंदाजीचं महत्त्व याविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “नवीन चेंडू जास्त कट करतो, ज्यामुळे फलंदाजांना खेळणं कठीण होतं. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेत नाही, त्यामुळे फिरकीपटूंना ओव्हरस्पिन गोलंदाजी करावी लागते. काही अडचणी आहेत, पण मी माझी लय कायम ठेवली आणि माझ्या चेंडूला योग्य रोटेशन दिलं. याचा आम्हाला फायदा झाला.”
या विजयासह भारतानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) मध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलंय. या सात विकेट्सच्या विजयासह भारताच्या गुणांची टक्केवारी 74.24 एवढी झाली, तर बांगलादेश 34.38 टक्क्यांसह सातव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही, मुंबईच्या फलंदाजानं इराणी चषकात शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर!
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता