मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 3 विकेट्सने विजय मिळवत या मोसमातील चौथा विजय मिळवला.
मात्र मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे त्याची सुरेश रैनाच्या आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सलग सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधीही हुकली आहे.
रोहित 2011 पासून आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सकडून सलग 133 सामन्यात खेळला होता. तर सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्सकडून सलग 134 सामने खेळले आहेत. त्यामुळे रोहितला रैनाच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. परंतू रोहित दुखापतग्रस्त झाल्याने त्याला ही संधी गमवावी लागली.
आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सलग सामने खेळण्याच्या यादीत रैना आणि रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधाक विराट कोहली आहे. त्याने 129 सलग सामने बेंगलोरकडून खेळले आहेत.
तर चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने चेन्नईकडून आत्तापर्यंत 119 सामने सलग खेळले असून यात अजून खंड पडलेला नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणारा आजचा सामना हा धोनीचा चेन्नईकडून सलग 120 वा सामना असेल.
बुधवारी रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद किरॉन पोलार्डने सांभाळले. याबरोबरच त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत मुंबईला विजयही मिळवून दिला. त्याने या सामन्यात 31 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकार मारत 83 धावांची तुफानी खेळी खेळेली. त्यामुळे मुंबईला पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान पार करणे शक्य झाले.
पंजाबकडून केएल राहुलने आयपीएलमधील पहिली शतकी खेळी करताना 64 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 197 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबईचा राजा एकच! मुंबई इंडियन्सचे किंग्स इलेव्हन पंजाबला सोशल मीडियावर प्रतिउत्तर…
–एमएस धोनीला आयपीएलमध्ये सर्वात मोठा इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी






