मोहाली। शुक्रवारपासून (४ मार्च) भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खास असणार आहे. हा त्याचा १०० वा कसोटी सामना आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा नवनिर्वाचीत कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रतिक्रिया दिली आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला विराटच्या १०० व्या कसोटीनिमित्ताने (100th Test) विविध प्रश्न विचारण्यात आले. विशेष म्हणजे हा सामना रोहितचा भारतीय कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे.
विराटबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘त्याच्यासाठी हा मोठा प्रवास आहे आणि तो त्याच्यासाठी सुंदर होता. त्याने कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली आहे आणि संघ ज्याप्रकारे प्रगती करत गेला, त्यादृष्टीने त्याने अनेक गोष्टी बदलल्या. हा नक्कीच त्याच्यासाठी खास प्रवास होता आणि येत्या काही वर्षातही हा प्रवास चालू राहिल.’
तसेच रोहित म्हणाला, ‘आम्हाला नक्कीच हा सामना त्याच्यासाठी खास बनवायचा आहे. आशा आहे की, आम्ही ५ दिवस चांगले क्रिकेट खेळू. एक संघ म्हणून आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये २०१८ साली जिंकलेली मालिका खूप चांगली होती आणि त्यावेळी विराट कर्णधार होता.’
तसेच रोहितने त्याला आवडलेल्या विराटच्या खेळीबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, ‘वैयक्तिकरित्या, एक फलंदाज म्हणून माझी आठवणीतील खेळी म्हणजे त्याचे २०१३ साली दक्षिण आफ्रिकेत झळकावलेले कसोटी शकत. त्यावेळी खेळपट्टी आव्हानात्मक होती आणि चेंडूला खूप उसळी मिळत होती.’
पुढे रोहित म्हणाला, ‘त्यावेळी अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा खेळत होते आणि त्यावेळी मॉर्केल, स्टेनसारख्या गोलंदाजांचा सामना करायचा होता. ते सर्व सोपे नव्हते, पण विराटने पहिल्या आणि दुसऱ्या डावात ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती त्याची सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. मला ती खेळी स्पष्टपणे आठवत आहे. या खेळीने त्याच्या पर्थमधील खेळीलाही मागे टाकले.’
https://twitter.com/BCCI/status/1499341938637479936
याबरोबरच भारताच्या कसोटी संघाचे पहिल्यांदाच नेतृत्त्व करणार असलेला रोहित म्हणाला, ‘माझे लक्ष सध्या केवळ सामने जिंकण्यावर आणि संघातील योग्य खेळाडूंसह योग्य गोष्टी करण्याकडे आहे. एक संघ म्हणून आम्ही एका चांगल्या स्थानी आहोत आणि याचे श्रेय विराटला आहे की त्याने या क्रिकेट प्रकारात आपल्याला या स्थानी आणले आहे.’
‘त्याने कसोटी संघात जे काही केले आहे, ते पाहायला सुंदर आहे. मी फक्त त्याने जिथून सोडले, तिथून पुढे संघाला घेऊन जाणार आहे.’ तसेच रोहितने सांगितले की, प्रत्येक सामन्यासह प्रगती करायची आहे.
श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाचा बातम्या –
चेल्सी फुटबॉल क्लब निघाला विक्रीला! रशियन संघमालकाचा सत्कार्यासाठी निर्णय
“कधी वाटले नव्हते १०० कसोटी खेळेल”; ऐतिहासिक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट झाला व्यक्त
IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी