भारतीय संघाने २००८ नंतर पाकिस्तान देशात कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले नाही. एकवेळ पाकिस्तान दौऱ्याची मोठी चर्चा होतं असे. परंतु दोन देशांतील खराब संबंधांचा परिणाम क्रिकेटवरही झाला.
त्यामुळे आता दोन देशांत अगदी कुठेच द्विपक्षीय मालिकाही होतं नाही. अशा वेळी हे दोन देश फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात. अशात आता भारताचे खूप कमी खेळाडू असे राहिले आहेत, ज्यांनी निवृत्ती घेतली नाही परंतु त्यांनी एकदा तरी पाकिस्तान देशात क्रिकेट खेळले आहे.
भारतीय वनडे व टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. तो पदार्पणाच्या पुढच्याच वर्षात म्हणजे २००८मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला त्याच्या आज १३ वर्ष पुर्ण झाली आहेत.
पाकिस्तान दौऱ्यावर जाणारा व भारताच्या तीनही प्रकारातील संघाचा सध्या भाग असलेला तो एकमेव खेळाडू सध्या संघात आहे.
भारताकडून पाकिस्तान देशात ९४ क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील ३२ खेळाडूंनी २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानात एकतरी सामना खेळला आहे. यातील निवृत्ती न घेतलेले खेळाडू पाहिले तर एमएस धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना, पार्थिव पटेल, हरभजन सिंग, रॉबीन उथप्पा, इशांत शर्मा, एस. श्रीशांत व पियुष चावला या खेळाडूंची नावे पुढे येतात.
यातील इशांत शर्मा हा कसोटी संघाचा पुर्णवेळ सदस्य असून तो लवकरच १०० कसोटी सामने खेळणार आहे. एमएस धोनी टी२० विश्वचषक खेळून निवृत्ती घेऊ शकतो. परंतु गेले एक वर्ष त्याने टीम इंडियाकडून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले नाही.
सुरेश रैना, रॉबीन उथप्पा, एस. श्रीशांत व पियुष चावला हे भारतीय संघात परतण्यासाठी धडपड करत आहे. परंतु नविन प्रतिभावान खेळाडूंकडे पाहिले की त्यांचे परतणे कठीण दिसत आहे. हरभजन सिंग किंवा पार्थिव पटेल यांचा संघ व्यवस्थापन नक्कीच विचार करत नसणार.
यामुळे सध्या संघात असलेल्या खेळाडूंमध्ये फक्त रोहित शर्मा व इशांत शर्मा यांनीच पाकिस्तान दौरा केला आहे. भविष्यातही काही वर्ष भारतीय संघ या देशाचा दौरा करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहलीला या देशात खेळायला मिळते की नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.