भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातीलच एका विक्रमासाठी १३ डिसेंबर ही तारीख क्रिकेट फॅन्ससाठी अतिशय खास आहे.
रोहितने १३ डिसेंबर २०१७ साली श्रीलंका विरुद्ध मोहाली येथील वन डे सामन्यात २०८ धावा करत आपल्या करियर मधील तिसरे द्विशतक पूर्ण केले होते. वनडे क्रिकेट इतिहासामध्ये एका पेक्षा जास्त द्विशतक करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
श्रीलंकन गोलंदाजांची केली धुलाई
२०१७ साली श्रीलंका विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आल्याने रोहित पूर्ण मालिकेसाठी भारताचा कर्णधार होता. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यामुळे या सामन्यात उतरतांना भारतीय संघावर दडपण होते, मात्र अशा परिस्थितीत देखील रोहितने आक्रमक फलंदाजी करत १५३ चेंडूत २०८ धावांची खेळी केली होती.
या द्विशतकी खेळीत त्याने १३ चौकार व तब्बल १२ षटकारांची आतीषबाजी केली होती. डावातील ४४ वे षटक सुरंगा लकमलने टाकले असता या षटकात रोहितने ४ षटकार मारले होते. रोहितच्या या खेळीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव केला होता.
रोहित व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर (२००), विरेंद्र सेहवाग (२१९), क्रिस गेल (२१५) मार्टिन गप्टिल (२३७), फखर जमान (२१०) यांनी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक केलेले आहे. रोहितने या खेळीपूर्वी २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०९ धावा, तसेच २०१४ साली श्रीलंका विरुद्ध २६४ धावांची अविस्मरणीय खेळी केलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनची जोरदार तयारी! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित गाळतोय नेट्समध्ये घाम, पाहा व्हिडिओ
विराटने नेतृत्व सोडल्यावर प्रथमच आली गंभीरची प्रतिक्रिया; सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट
आयपीएल २०२२ बाबत बीसीसीआय अध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर






