बीसीसीआयने ८ डिसेंबर रोजी भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधापदावरून विराट कोहली (virat kohli) याला हटवले आणि रोहित शर्मा (rohit sharma) याची या पदावर नियुक्ती केली. विराटने यापूर्वी टी२० विश्वचषक संपल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद देखील सोडले होते. आता विराट फक्त कसोटी संघाचा कर्णधारपद राहिला आहे. टी२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद रोहितकडे सोपवण्यात आल्यामुळे बोलले जात आहे की, आता विराटवरचा दबाव कमी होईल आणि त्याच्या प्रदर्शनात सुधारणा पाहायला मिळेल. अशात भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर (gautam gambhir) याने देखील त्याचे मत मांडले आहे.
भारतीय संघाचे तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व करत असल्यामुळे विराटला नेहमीच उत्साहात पाहिले गेले आहे. तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना देखील पूर्ण उत्साहात दिसायचा. गंभीरच्या मते, टी२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर देखील त्याच्या या स्वभावात कसलाही बदल होणार नाही. गंभीर म्हणाला, “मला विश्वास आहे की, भारताला विराट कोहलीचे सर्वश्रेष्ठ पाहायला मिळेल, मग तो लाल चेंडू असो किंवा पांढरा चेंडू. त्याचसोबत, एवढ्या वर्षात ज्याप्रकारचा उत्साह आणि उर्जा दाखवली आहे, तुम्हाला विराट कोहलीकडून तेच सर्व पाहायला मिळेल, मग तो कर्णधार असेल किंवा नसेल.”
कोहलीने आतापर्यंत भारतासाठी खेळताना अनेकदा महत्वाच्या वेळी चांगल्या खेळ्या करून दाखवल्या आहेत. मात्र, मागच्या दोन वर्षांमध्ये त्याचा फॉर्म खूपच खालावला आहे आणि यादरम्यान त्याला एक शतक देखील करता आले नाही. गंभीरच्या मते दोन प्रकारांचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये सुधारणा होईल. “यामुळे कोहलीला जास्त मोकळीक मिळू शकते. कर्णधारपदाचे ओझे नसल्यामुळे तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पहिल्यापेक्षा देखील जास्त खतरनाक बनू शकतो. मला विश्वास आहे की, तो भारताला अभिमान वाटून घेण्याची संधी देईल. पाढऱ्या चेंडूचे क्रिकेट असो किंवा लाल चेंडूचे, तो नेहमी धावा करत राहील,” असे गंभीर पुढे म्हणाला.
दरम्यान, आगामी काळाता भारतीय संघाला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना व्हायचे आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्याची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. दौऱ्यातील कसोटी मालिकेत विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल. तर वनडे मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच संघाच्या नियमित कर्णधाराच्या रूपात भारताचे नेतृत्व करेल.
महत्वाच्या बातम्या –
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी
आपला जड्डू जगात भारी! माजी प्रशिक्षकाने केली मुक्तकंठाने प्रशंसा