आयपीएलच्या 13 व्या हंगामाची यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले होते. मुंबई इंडियन्सचा हा यूएईमधील सलग पाचवा पराभव होता. त्यानंतर झालेल्या सामन्यात मुंबई संघाने केकेआरचा 49 धावांनी पराभव केला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुबंई संघ चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने 4 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.
रोहितने नेतृत्वाचे गुण ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंगकडून घेतले आहे. याबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग याच्याकडून बरेच काही शिकलो. मी माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू काय योगदान देऊ शकतो हे पहातो. यात माझी कामगिरीसुद्धा खूप महत्वाची आहे. मी सर्व दहा खेळाडूंशी खेळासंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. जे खेळाडू सामना खेळत नाही त्यांच्याशीसुद्धा चर्चा करत राहतो. मी त्यांनाही महत्त्व देतो. ही गोष्ट मी त्याच्याकडून शिकली आहे.”
पुढे बोलतांना रोहित म्हणाला, “पॉंटिंगने एकदा मला सांगितले की, जेव्हा आपण कर्णधारपदी असतो, तेव्हा आपण खेळाडूंना सांगू शकत नाही की तुमच्याकडून मला एका विशिष्ट प्रकारचा खेळ हवा आहे. ते कशी कामगिरी करेल हे आपण ठरवू शकत नाही. त्यांचे नेहमीच ऐका, त्यांनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, त्या गोष्टींवर काम करा आणि त्या गोष्टीत काय बदल करता येतो तो बदल करून खेळाडूंना सांगा.”
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचा किताब जिंकला आहे.






