चौथ्या कसोटी सामन्यात एकवेळ पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले आणि विजय मिळवला. या सामन्याचा मानकरी म्हणून रोहित शर्माला निवडण्यात आले. त्यामुळे त्याच्या नावावर आता एक विक्रम झाला आहे.
दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या शतकी (१२७) खेळीसह भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत ४६६ धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यामुळे इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान मिळाले होते. यानंतर इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र भारतीय संघाने पुन्हा या सामन्यात पुनरागमन केले आणि चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केले. तसेच रोहित शर्माला या सामन्यात दुसऱ्या डावात केलेल्या १२७ धावांच्या दमदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.
रोहितला मिळालेल्या या सामनावीराच्या पुरस्कारामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंगला पछाडले आहे. रोहितची सामनावीर पुरस्कार मिळवण्याची ३५ वी वेळ होती. युवराजला आतापर्यंत ३४ वेळा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. या यादीत युवराज आता पाचव्या क्रमांकावर गेला.
या यादीत सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाला आहे. सचिनला तब्बल ७६ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याला आजपर्यंत ५७ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. तर ३७ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवत सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ३५ सामनावीराच्या पुरस्कारासह रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १९१ धावाच बनवू शकला होता. ज्यानंतर इंग्लंडने २९० धावा करून भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघ बॅकफूटवर पडला होता. मात्र या मालिकेतील तिसरा आणि चौथा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला.
रोहित शर्मा(१२७), चेतेश्वर पुजारा(६१), शार्दुल ठाकुर(६०), रिषभ पंत(५०), केएल राहुल(४६) आणि विराट कोहली(४४) यांनी शानदार खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाने ४६६ धावसंख्येचे पर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान दिले.
यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचे सलामीचे फलंदाज हसिब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. ज्यामध्ये दोघांनीही मिळून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र शेवटच्या आणि निर्णायक दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व गाजवले. इंग्लंडचे सलामीचे दोन फलंदाज सोडल्यास इतर कोणताही इंग्लिश फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडला २१० धावांत गुंडाळले. ज्यामुळे भारतीय संघाने हा सामना तब्बल १५७ धावांनी जिंकला. भारताकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक ३ विकेट्स उमेश यादवने घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–आशियाचा किंग! ओव्हल कसोटीतील विजयासह विराट ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार
–‘लॉर्ड शार्दुल’ इन ॲक्शन! जो रुटला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला दिला जोरदार दणका, पाहा व्हिडिओ
–व्वा बेटे, मौज कर दी! एरवी सर्वांना ट्रोल करणारा जाफर, कॉट्रेलच्या ‘हिंदी’ उत्तराने झाला गार