भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहितने यापूर्वी १९ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या सामन्यात त्याचे नेतृत्व वाखाणण्याजोगे राहिले आहे.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर, रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाला. रोहित शर्माने यापूर्वी बऱ्याटदा टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, मात्र पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो प्रथमच मैदानात उतरणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने १९ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्यात त्याने १५ सामने जिंकले आणि ४ सामने गमावले आहेत.
कर्णधार म्हणून रोहितची टी-२० क्रिकेटमधील विजयाची टक्केवारी ७८.९५ आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांतील ५३ टी-२० कर्णधारांमध्ये रोहितची विजयाची टक्केवारी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. या यादीत अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू असगर अफगाण अव्वल स्थानावर आहे. त्याची विजयाची टक्केवारी ८०.७७ इतकी राहिली आहे.
रोहित शर्माने एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ७१२ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ शतके करणारा तो एकमेव कर्णधार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी असेल. जर या मालिकेत रोहित शर्माने (३०३८ धावा) १९० धावा केल्या, तर त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला (३२२७ धावा) मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची संधी असेल. मात्र, या बाबतीत त्याला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (३१४७ धावा) याच्याशी देखील स्पर्धा करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ, Live: पहिल्या टी२०च्या नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात, वेंकटेश अय्यरचे पदार्पण
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचे ‘हे’ २ खेळाडू ठरू शकतात हुकमी एक्के