आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात नामिबियावर नऊ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने ८ गडी गमावून १३२ धावा केल्या होत्या. भारताने फक्त १ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात रोहित शर्माने तीन झेल घेतले. सामन्यादरम्यान त्याने घेतलेला शेवटचा झेल चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ आयसीसीने देखील शेअर केला आहे.
रोहितने कव्हरमध्ये पुढे जाऊन जेजे स्मितचा अफलातून झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने शेअर केला आहे. रवींद्र जडेजा सामन्यातील पंधराव्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत होता. स्मितने चेंडू टोलावला आणि रोहितने कव्हरमध्ये पुढे जाऊन जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवत सुंदर झेल घेतला. स्मित ९ चेंडूत ९ धावा काढून बाद झाला.
https://www.instagram.com/p/CWBPg86FLBi/
या सामन्यादरम्यान रोहितने जैन निकोल लॉफ्टी ईटन, डेविड विसे आणि स्मित यांचा झेल घेतला. रोहितसाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील शेवटचा सामना चांगला ठरला. रोहितने क्षेत्ररक्षणादरम्यान तीन झेल घेतले. याशिवाय त्याने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या.
टी२० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित अपयशी ठरला होता, पण त्यानंतर त्याने सलग तीन सामन्यांमध्ये ७४, ३० आणि ५६ अशा धावा केल्या. रोहित पाकिस्तानविरुद्ध खाते न उघडता बाद झाला, तर न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या १४ धावा करून बाद झाला होता. भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता.
दरम्यान या सामन्यात नामिबियाने २० षटकात ८ विकेट गमावून १३२ धावा केल्या. भारताने १५.२ षटकात १ गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. रोहित शर्माने ५६ धावांची शानदार खेळी खेळली आणि केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारीही केली. राहुलने विजयी चौकार लगावला आणि ३६ चेंडूत ५४ धावा करून नाबाद परतला. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजानेही ३-३ बळी घेतले. रवींद्र जडेजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाविरुद्ध पंतने केली अशी काही कृती की चाहत्यांना आठवला यष्टीरक्षक धोनी, पाहा व्हिडिओ
बॅटला पाय लागताच रिषभ पंतने केली मन जिंकणारी कृती, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
रोहित शर्मा का होऊ शकतो भारताच्या टी२० संघाचा उत्तम कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं