कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर असून टी२० मालिका खेळत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील टी२० मालिकेला (T20I Series) बुधवारी सुरुवात झाली. पहिल्याच टी२० सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात युवा फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने महत्त्वाची भूमीका पार पाडली. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
बिश्नोईचे संघसहकाऱ्यांकडून कौतुक
रवी बिश्नोईने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच दमदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याने रोस्टन चेस आणि रॉवमेन पॉवेल यांना बाद केले. त्याने या दोन्ही विकेट्स ११ व्या षटकात घेतल्या. हा सामन्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
दरम्यान रोस्टन चेस हा बिश्नोईची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलीच विकेट ठरला होता. त्यामुळे ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जेव्हा त्याने चेसला पायचीत पकडले, त्यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी लगेचच बिश्नोईचे अभिनंदन केले. या घटनेचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की, चेसला बाद करून आपली पहिली विकेट घेतलेला बिश्नोई आनंद व्यक्त करत आहे, तर त्याचवेळी त्याच्याशी युजवेंद्र चहलने संवाद साधला. तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी त्याचे अभिनंदन केले.
https://www.instagram.com/p/CaCrppZjxYh/
चहलच्या हस्ते मिळाली पदार्पणाची कॅप
२१ वर्षीय बिश्नोई भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण (T20I Debut) करणारा ९५ वा खेळाडू ठरला आहे. तसेच हे बिश्नोईचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील होते. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ३८५ वा खेळाडू ठरला. त्याला बुधवारी सामन्यापूर्वी त्याच्या पदार्पणाची कॅप भारताचा दिग्गज फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हस्ते देण्यात आली.
तसेच या सामन्यात भारताकडून दोन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या बिश्नोईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे भारतासाठी पहिलाच टी२० सामना खेळताना पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो तिसरा फिरकी गोलंदाज बनला आहे. यापूर्वी प्रज्ञान ओझा आणि अक्षर पटेल यांनी असा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी रणजीच्या रणांगणात रचला इतिहास!
पीएसएलमध्ये गायले गेले धोनीचे गुणगान! समालोचक म्हणाले, “आता तोच या खेळाडूला सुधरवेल”
आयपीएल २०२२ मध्ये कमी किमतीत विकले गेलेले ‘हे’ खेळाडू ठरु शकतात ‘गेमचेंजर’