भारतीय संघाकडे कसोटी क्रिकेटमध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व रविचंद्रन अश्विन हे आपल्या एकट्याच्या कामगिरीवर संघाला सामना जिंकून देवू शकतात. परंतु एका खेळाडूशिवाय भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणे सोपे जाणार नाही. आपण ज्या खेळाडूविषयी बोलत आहोत तो आहे भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. रोहित शर्माने संपूर्ण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी केलेली आहे.
रोहित शर्मा हा बऱ्याच काळापासून केवळ मर्यादित षटकांचा उत्तम फलंदाज मानला जात असे, परंतु जेव्हापासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळण्याची संधी मिळाली तेव्हापासून त्याने हे सिद्ध केले की तो कसोटी क्रिकेटमध्ये देखील उत्तम कामगिरी करू शकतो. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुखापतीमुळे रोहितला सर्व सामने खेळता आले नाही, परंतु त्याने खेळलेल्या 11 सामन्यात 64.37 च्या शानदार सरासरीने 1030 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रोहितने भातासाठी सर्वाधिक 4 शतके झळकावली आहेत. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील रोहित शानदार कामगिरी करू शकतो.
भारताकडून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्व सामने खेळणार्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश होतो. या संपूर्ण स्पर्धेत पुजाराने सर्व 17 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 818 धावा केल्या आहेत. परंतु त्याला एकही शतक ठोकण्यात यश आले नाही. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने संपूर्ण स्पर्धेच्या 17 सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत 43.80 च्या सरासरीने 1095 धावा केल्या आहेत. रहाणेने या स्पर्धेत 3 शतके देखील झळकावली आहेत. परंतु रोहितशी तुलना केली असता त्याची कामगिरी थोडी कमी जाणवते. रोहित आणि रहाणे यांच्यातील फरक एकाच शतकाचा असला तरी रोहितने रहाणेपेक्षा 6 कसोटी सामने कमी खेळलेले आहेत आणि त्याची सरासरी देखील रहाणेपेक्षा उत्तम आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या रोहितकडून सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींना न्यूझीलंड विरुद्धच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! भारताच्या अव्वल गोलंदाजांच्या वडिलांचे निधन, यकृताच्या कर्करोगाने होते त्रस्त
आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकत हे भारतीय खेळाडू ठरले आहेत सिक्सर किंग