भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १७ नोव्हेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी विराट कोहलीने भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माकडे भारताच्या टी२० संघाचे नियमित कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा नियमित टी२० कर्णधार म्हणून रोहित पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान, त्याचे एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेला जयपूरमधून सुरुवात होत आहे. त्यामुळे रोहितचे एक जुने ट्वीट सध्या चर्चेत आहे. रोहितने २०१२ साली म्हणजेच ९ वर्षांपूर्वी एक ट्वीट केले होते, त्यावेळी त्याने जयपूरमध्ये नेतृत्त्व करण्याबद्दल लिहिले होते. खरंतर २०१२ साली रोहितने जयपूर येथील केएल सैनी मैदानात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्त्व केले होते. त्यावेळी त्याने हे ट्वीट केले होते.
त्याने ९ वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की ‘जयपूरमध्ये पोहोचलो आहे आणि हो, मी संघाचे नेतृत्त्व करत आहे. वाढलेल्या जबाबदारीबद्दल उत्सुक आहे.’
विशेष म्हणजे जयपूरमध्येच रोहित भारताचा नियमित टी२० कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्त्वाबाबत जयपूर शहराला वेगळे महत्त्व आले आहे.
Touched down in jaipur and yes I will be leading the side, looking forward to the added responsibility 🙂
— Rohit Sharma (@ImRo45) November 7, 2012
रोहितची कर्णधार म्हणून कामगिरी
रोहितने यापूर्वी विराटच्या अनुपस्थितीत अनेकदा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. विराटच्या अनुपस्थितीत त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने आशिया चषक, निदाहास ट्रॉफी, अशा महत्त्वाच्या मालिकांमध्ये कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे.
रोहितने भारतीय संघाचे आतापर्यंत २९ सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यापैकी २३ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला, तर केवळ ६ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. यातील १९ सामने टी२० क्रिकेट प्रकाराचे होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १५ टी२० सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. टी२० मध्ये भारताचा तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एमएस धोनीने ४१ आणि विराट कोहलीने ३० टी२० सामने भारताला जिंकून दिले आहेत.
रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमीयर लीगमध्ये २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ हंगामाची विजेतीपदं मिळवली आहेत. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेचे वेळापत्रक
१७ नोव्हेंबर – पहिला टी२० सामना – जयपूर
१९ नोव्हेंबर – दुसरा टी२० सामना – रांची
२१ नोव्हेंबर – तिसरा टी२० सामना – कोलकाता
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड चीत करायला भारतीय संघ उतरणार मैदानात, अशी असू शकते ‘प्लेइंग ११’
ऍशेस मालिकेत इंग्लंडला आव्हान देण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज; पहिल्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा