---Advertisement---

टीम इंडियाला रोहितचे टेंशन! १५ महिन्यांपासून केले नाही शतक, संघातील स्थानही आलंय धोक्यात

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 9:56 AM
---Advertisement---

चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा त्याची छाप पाडण्यात अपयशी ठरला. तो या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १२ धावा करुन बाद झाला. पहिल्या डावात त्याला जोफ्रा आर्चरने आणि दुसऱ्या डावात जॅक लीचने बाद केले. त्यामुळे सध्या त्याच्यावर टीका होत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही समाधानकारक कामगिरी –

इंग्लंड विरुद्धची मालिका खेळण्याआधी रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या शेवटच्या २ सामन्यात खेळला होता. या दोन सामन्यात त्याला एकच अर्धशतक करता आले होते. खरंतर त्यावेळी त्याच्याकडून अनुभवी फलंदाज म्हणून अनेकांनी मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती.

मायदेशात कसोटी सलामीवीर म्हणून तिसरी मालिका –

सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेली कसोटी मालिका ही रोहितसाठी कसोटी सलामीवीर म्हणून मायदेशातील दुसरीच मालिका आहे. याआधी तो पहिल्यांदा कसोटीत सलामीवीर म्हणून २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या मालिकेत त्याने २ शतके आणि १ द्विशतक ठोकले होते. त्याची ही कामगिरी पाहता तो इंग्लंडविरुद्धही मायदेशात अशीच मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, पहिल्या सामन्यात तरी तो याबाबतीत अपयशी ठरला आहे.

रोहितचा फॉर्म भारतासाठी चिंताजनक –

रोहितच्या कसोटीतील फॉर्मचा विचार करायचा झाल्यास गेल्या ८ डावात त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. त्याने अनुक्रमे ६,२१,२६,५२, ४४,७,६ आणि १२ अशा धावा केल्या आहेत. त्याने याआधी शतकी खेळी रांचीमध्ये ऑक्टोबर २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्याने त्यावेळी २१२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गेल्या १५ महिन्यात त्याच्या बॅटमधून शतकी खेळी आलेली नाही. त्यामुळे सध्या रोहितचा कसोटीतील खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

कसोटी कारकिर्दीत उतार-चढाव-

रोहितने २०१३ मध्ये जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा त्याने पहिल्या दोन सामन्यात शतकी खेळी करत धडाक्यात कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्याला तिसरे शतक करण्यासाठी त्याला तब्बल ४ वर्षे वाट पाहावी लागली. त्याने सन २०१७ ला श्रीलंकेविरुद्ध शतक केले होते. यानंतर त्याने थेट २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना तीन शतकी खेळी केल्या.

त्यातही रोहितसाठी परदेशातील कसोटी कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्याने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज असे परदेशी दौरे केले आहे. पण एकाही दौऱ्यात त्यावा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याची परदेशातील सर्वोत्तम कामगिरी ही ७९ धावा अशी आहे.

रोहित जसा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला तसा तो कसोटीत ठरताना दिसत नाही. त्यातच सध्या अनेक युवा क्रिकेटपटू संधीची वाट पाहात आहेत. त्यामुळे रोहितला आता चांगली कामगिरी करुन कसोटी संघातील जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 …म्हणून रिषभ पंतने करू नये फलंदाजी शैलीत बदल, भारतीय दिग्गजाने सांगितले कारण

“पंतमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असती, तर भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकलीच नसती”

आव्हान मोठे असले तरी भारताला विजय शक्य; १२ वर्षांपूर्वीही केला होता असाच कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---