यूएई आणि ओमानमध्ये बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघाकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. मैदानात नेहमी आक्रमक असणारा रोहित शर्मा अनेकदा मैदानाबाहेर मस्ती करताना दिसून आला आहे. असाच काहीसा प्रकार भारत-अफगानिस्तान सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे सावट पसरल्यामुळे क्रिकेटपटूंना बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. ज्यामुळे पत्रकार परिषद देखील झूम मीटिंगद्वारे घेण्यात येत होती. परंतु टी२० विश्वचषकात प्रत्यक्षात पत्रकार परिषद घेतली जात आहे. भारत विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतरही पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये पत्रकारांना देखील प्रवेश देण्यात आला होता. पत्रकारांना पाहून रोहित शर्मा भलताच खुश झाला आणि पत्रकारांची संख्या मोजू लागला होता.
त्यानंतर तो म्हणतो की, “इतके दिवस झूमवर पत्रकार परिषद होत होती.” रोहित शर्माचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/NextBiIIionairs/status/1455970941016559617?t=dE8kuI-oJnTmRf0NmgjoZA&s=19
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ बाद २१० धावा केल्या होत्या.रोहित शर्माने या डावात सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाला ७ बाद १४४ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार
विराटला १५७७ दिवसानंतर समजली अश्विनची ‘किंमत’, त्यानेही १४ धावांवर २ विकेट्स घेत दाखवली ताकद
भारत वि. अफगाणिस्तान सामन्यास तालिबानी नेत्याने लावली हजेरी, व्हिडिओ पोस्ट करत दिला संदेश